निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
निपाणीतील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच जैन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे श्री. कांतीलाल मगनलाल राठोड यांचा ६९वा वाढदिवस निपाणी बार असोसिएशनतर्फे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येत असतानाच, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि माणुसकीचा संदेशही या सोहळ्यातून अधोरेखित झाला.
आज सकाळपासूनच निपाणी व ग्रामीण भागातील अनेक महनिय व्यक्तींच्याकडून श्री.कांतीभाई राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यामध्ये सहकार रत्न युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील, ममदापूरचे श्री.निरंजन पाटील (सरकार), पप्पू शिंदे ,इम्रान मकानदार, कुमार गोरवाडे, रावसाहेब गोरवाडे, सुरज राठोड, शेखर पाटील, आशिष खोडबोळे, श्रेणिक राठोड, व राठोड कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार तसेच इतर मान्यवर उपस्थित राहून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत होते.
कांतीभाई राठोड यांनी आपल्या सामाजिक कार्यातून केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा जपली आहे. निपाणी बार असोसिएशनला साऊंड सिस्टीम व पोडियम भेट देण्याबरोबरच मागील अनेक वर्षांपासून शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच बसस्थानक परिसरात पाणपोईची व्यवस्था करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूटचे वाटप, गरजूंसाठी चष्मे व श्रवणयंत्रांचे वितरण, महामारी व महापुराच्या काळात मदतीचा हात, तसेच राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील अनाथाश्रमाला व्हीलचेअर व आवश्यक साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांतून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. रक्तदान व क्रीडा क्षेत्रालाही त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कांतीलाल राठोड म्हणाले की, आपण कोणत्या कुटुंबात जन्मलो यापेक्षा आपण जीवन कसे जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे. समाजाकडून मिळालेल्या संपत्तीतील काही भाग समाजासाठी दान करणे ही अत्यंत श्रेष्ठ भावना आहे. दान केल्याने पुण्य वाढते आणि समाजासाठी केलेली सेवा हीच खऱ्या अर्थाने जीवनाची संपत्ती ठरते. पूर्वी सामाजिक कार्यातून राजकारणात जाण्याची परंपरा होती; मात्र आज सामाजिक जीवनाच्या व्याख्याच बदलल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने त्यांचे जीवनमान खालावत आहे, तर शिक्षणाचा दर्जाही चिंताजनक पातळीवर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आई-वडील हेच जीवनातील सर्वात मोठे गुरू असून, त्यांच्या ऋणाची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. वैराट होते. त्यांनी राठोड यांच्या निपाणी बार असोसिएशनसह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना भूतकाळात केलेल्या सहकार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बार असोसिएशनचे सेक्रेटरी ॲड. निलेश हत्ती यांनी केले. ॲड. एम. व्ही. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात राठोड हे सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळून जाणारे, मनमिळावू आणि ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’ या भावनेने प्रेरित होऊन कार्य करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. जैन समाजासह सर्व समाजघटकांसाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजहिताचे कार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष एम. व्ही. सनदी, जॉईंट सेक्रेटरी वंदना इनामगौडर एस. एस. पाटील, एस. एस. बन्ने, जे. ए. भोसले, व्ही. व्ही. श्रीपन्नावर, यांच्यासह बार असोसिएशनचे अनेक सदस्य उपस्थित होते. कांतीलाल राठोड यांच्या वाढदिवसाचा हा सोहळा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न ठरता, समाजाकडून मिळालेले समाजालाच परत देण्याची आणि माणुसकीची ज्योत सदैव तेवत ठेवण्याची प्रेरणा देणारा सोहळा ठरला.