निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
निपाणी तालुक्यातील तवंदी गावचे सुपुत्र आणि भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG) सुधाकर पाटील यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि देदीप्यमान सेवेबद्दल महामहिम राष्ट्रपतींच्या वतीने 26 जानेवारी 2026 रोजी 77 व्या प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘तटरक्षक पदक’ देऊन गौरविण्यात आले आहे.
तीन दशकांहून अधिक काळ भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असताना त्यांनी केवळ देशाच्या सागरी सीमांचे रक्षण केले नाही, तर दलाच्या आधुनिकीकरणातही मोलाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक नव्या कार्यालयीन नियुक्तीमध्ये त्यांनी संबंधित राज्य व केंद्र शासनाच्या विभागांशी उत्तम समन्वय प्रस्थापित करून तटीय सुरक्षा यंत्रणा अधिक सुदृढ करणे, तुकडीतील जवानांचे आयुष्य अधिक सुयोग्य बनविणे, सर्व महत्वाचे भूसंपादन प्रकल्प मार्गी लावणे, अत्यंत प्रतिष्ठित व कार्यात्मक सज्जतेसाठी आवश्यक निर्माण प्रकल्पांना संरक्षण मंत्रालयाची मंजुरी प्राप्त करणे, महत्त्वाच्या जमिनींचे प्रश्न सोडवणे, गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणे तसेच ‘सजग’ या तटरक्षक दलाच्या जहाजाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावणे असे अनेक कार्ये त्यांनी अतिशय व्यावसायिक रीतीने पार पाडले. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचे कौशल्य आणि नेतृत्व गुण दिसून आले आहेत. 🚢⚓
पोरबंदर पासून ते अंदमानपर्यंत आणि दिल्लीपासून ते आखाती देशांतील धोरणात्मक मोहिमांपर्यंत त्यांचा प्रवास सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विशेषतः कोविड-१९ च्या कठीण काळात त्यांनी दिल्ली येथे कमांडिंग ऑफिसर म्हणून बजावलेली अप्रतिम कामगिरी त्यांच्या संवेदनशील कर्तव्याची जाणीव करून देते.
हा सन्मान केवळ त्यांच्या कष्टाचा नाही, तर त्यांनी आजवर जोपासलेल्या प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटी, संयम, सातत्य आणि मूल्यांचा सन्मान आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.