निपाणी नगरी वृत्तसेवा (9)
“संस्कार, संस्कृती आणि जिद्दीच्या बळावर यशाचे शिखर गाठा: माजी न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे, केएलई स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालयात ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; मान्यवरांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन”
येथील नामांकित केएलई सोसायटीच्या स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालयात (I-PUC) प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा ‘ओरिएंटेशन’ अर्थात स्वागत व परिचय सोहळा अकोळ रोडवरील ‘निसर्ग लॉन्स’ येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय श्री. अरविंद एस. पाच्छापुरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष केएलई संस्थेचे संचालक श्री. महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कार आणि समृद्ध संस्कृतीचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित केले. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या नैतिक मूल्यांची जपणूक करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांना यशाचा सुवर्णमंत्र देताना ते म्हणाले की, जीवनात कधीही अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर खाचून जायचं नाही आणि यश मिळालं तर गर्वाने त्याला कवटाळायचं नाही, हाच जीवनात पुढे जाण्याचा खरा सक्सेस मंत्र आहे. विशेष म्हणजे, मी स्वतः याच केएलई संस्थेचा माजी विद्यार्थी आहे, अशी आठवण करून देताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. त्यांच्या अतिशय ओघवत्या, भारदस्त आणि अभ्यासपूर्ण वाणीने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हींचे मानवी जीवनातील महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे, याचे सुंदर विश्लेषण त्यांनी आपल्या भाषणातून मांडले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि केएलई संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. महांतेश एम. कवटगीमठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केएलई संस्थेच्या आजवरच्या देदिप्यमान प्रवासावर प्रकाश टाकला. संस्थेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घेतलेली ‘शून्यातून गरुडझेप’ आणि शिक्षणाचा केलेला विस्तार त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शिक्षणाला कोणत्याही भाषेचा अडसर कधीच नसतो, पण जर आपली मातृभाषा व्यवस्थित असेल तर आपण जगातील कोणत्याही भाषेवर सहज प्रभुत्व गाजू शकतो. त्यांच्या या सहज, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला. मागील शैक्षणिक वर्षांमध्ये के एल ई संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते मोठा दिमाखात करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्याला केएलई सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री. जयानंद एम. मुनावळ्ळी आणि श्री. प्रवीण ए. बागेवाडी हे गौरवमूर्ती म्हणून उपस्थित होते. संपूर्ण निपाणी नगरीत या भरगच्च आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध ठरलेल्या कार्यक्रमाची आणि मान्यवरांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे.