निपाणी नगरी वृत्तसेवा..(10)
मॉडर्न इंग्लिश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘कार्टून : ऐक्यम ‘ ने वेधले निपाणी करांचे लक्ष
मॉर्डन इंग्लिश शाळेच्या प्रांगणात दिनांक ९/१/२०२६ व १०/१/२०२६ रोजी पार पडलेल्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविधांगी कार्यक्रम सादर केले. संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मंच मिळाला. दोन दिवसीय पार पडलेल्या या कार्यक्रमाला अकोळचे विख्यात उद्योगपती श्रीयुत हेमंत जे सुर्वे, भारमल सर, निपाणी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु ए पाटील, मराठा मंडळ बेळगांवच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू उपस्थित होते.
मोठ्या शिशुगटाचा झालेला पदवी प्रदान सोहळा खूप आकर्षक भावनिक ठरला. मराठा मंडळ बेळगाव च्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांच्या हस्ते चिमुकल्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘कार्टून: ऐक्यम ‘ विविधतेतून एकता ही होती.ज्यातून भारताच्या विविध राज्यांची संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडले.
भरतनाट्यम्, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीते, पंजाबी, आसामी आणि विविध वेशभूषा अशा कार्यक्रमांनी रंगत आणली. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. पाहुण्यांच्या हस्ते यंदाच्या दहावीचा वर्गातील विद्यार्थ्यांना विविध पारितोषक व गतवर्षी दहावीच्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
शाळेच्या नेहमीच आकर्षण असणाऱ्या स्नेहसंमेलन पाहण्यासाठी पालक निपाणीतील सर्व पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली. हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आणि एक संस्मरणीय ठरले. ‘कलागुणांना दाद’ देणारे व्यासपीठ म्हणजे मॉडर्न इंग्लिश शाळेचे व्यासपीठ असे सकारात्मक सूर व शब्द उपस्थितांनी मांडले.
हे वार्षिक स्नेहसंमेलन पार पाडण्यासाठी मराठा मंडळ बेळगावच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जी नागराजू, शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे, मराठा मंडळ फार्मसी डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य श्री प्रमोद पाटील, सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.