निपाणी नगरी वृत्तसेवा..(1)
येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक विभाग, व्यंकटेश्वरा पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन झाला. अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी होते. प्राथमिकचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे, व्यंकटेश्वरा पदवीपूर्व महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम. डी. खोत यांची प्रमुख उपस्थित होती. मान्यवरांनी वि. वा. शिरवाडकर यांनी प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमात समर्थ कुंभार, प्रथमेश कांबळे, इंद्रजीत साठे, सानवी पाटणकर, सलोनी रोहिदास, अन्वेषा बोटे, आरजू नदाफ, प्राप्ती बाळमारे, ईशित्व बाळमारे, तनया गोडसे, अथर्व वडके, हरिप्रिया लोहार यांनी मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रदीप पाटील यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्यासह मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.
मुख्याध्यापक पचंडी यांनी मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती सांगताना म्हणाले कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आपल्याला आपल्या मातृभाषेची जाणीव करून देतो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि इतिहासाची ओळख आहे. आईच्या अंगाई गीतापासून ते संतांच्या अभंगा पर्यंत मराठी भाषेत आपल्या भावनांचे विश्व दडलेले आहे. ज्ञान, साहित्य, समाजप्रबोधन आणि विचारांची देवाणघेवाण यासाठी मराठीने नेहमीच भक्कम पाया दिला आहे. डिजिटल युगातही मराठीचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. आपली भाषा जपली तरच आपली ओळख टिकेल. चला, मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा अभिमान बाळगू आणि तिचा सन्मान राखू.
कार्यक्रमात यु. आर. पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.