निपाणी नगरी वृत्तसेवा..(1)
संपूर्ण भारत वर्षामध्ये 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारताचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी शोधलेल्या “रमण परिणाम” (Raman Effect) या ऐतिहासिक प्रयोगाच्या स्मरणार्थ विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. या प्रयोगाद्वारे प्रकाश किरणांची तरंगलांबी पदार्था मधून जाताना कशी बदलते आणि प्रकाशाचे विखुरण (Scattering) कसे होते, हे जगासमोर मांडले गेले. या शोधामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर होते. तसेच विज्ञान शिक्षिका श्रीमती के. एस. देसाई, श्री. ए. एम. यादव, श्री. एस. डी. साखरकर, आयोध्या मोरबाळे तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाशी संबंधित अनेक सुंदर व आकर्षक अशा आकृत्यांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. अणुरचना, सौरमाला, पेशींची रचना, मानवी हृदय, पर्यावरण चक्र अशा विविध विषयांवर आधारित रांगोळ्यांनी संपूर्ण परिसर विज्ञानमय झाला होता.
तसेच शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांतील सर्व साहित्याची आकर्षक व शिस्तबद्ध मांडणी करण्यात आली होती. विविध उपकरणे, मॉडेल्स, रासायनिक द्रव्ये, सूक्ष्मदर्शक, काच सामान, विद्युत उपकरणे इत्यादींचे प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक विषयातील प्रत्येक वस्तूची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. संबंधित शिक्षकांनी त्या साहित्याचा उपयोग, कार्यपद्धती आणि त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे सोप्या भाषेत समजावून सांगितली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक हळवणकर यांनी रमण परिनामाचे सोप्या व वैज्ञानिक पद्धतीने स्पष्टीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नव्हे, तर निरीक्षण, प्रयोग आणि सातत्यपूर्ण संशोधन हीच खरी विज्ञानाची ओळख आहे. विद्यार्थ्यांमध्ये दडलेले संशोधनात्मक गुण ओळखून त्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, प्रश्न विचारण्याची सवय लावावी आणि स्वतः प्रयोग करून अनुभवातून शिकावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विज्ञान विषयात वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ व्हावा यासाठी विज्ञान शिक्षिका श्रीमती के. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रतिज्ञा घेतली. व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. जे. आर. खपले यांनी केले.