ताज्या घडामोडी

संगीताला शेवट नाही ,काळाप्रमाणे ते बदलेल इतकेच – पंडित आल्पे

 


तळेगाव दाभाडे : येथील शेजार जेष्ठ नागरिक संघात श्रीरंग कला निकेतन आणि शेजार जेष्ठ आयोजित पंडित विनोदभूषण आल्पे या महान गायकाचा “गप्पागाणी”अर्थात “मी गवई कसा झालो” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . तो एकेक मौल्यवान दागिन्यातून एखाद्या अस्सल जोहरी प्रमाणे एक एक मौल्यवान हिरा काढावा , त्याला पैलू पाडावा तसे श्रीकृष्ण पुरंदरे यांनी आपल्या बहारदार मुलाखतीच्या शैलीने आल्पेजींचा एक एक जीवन विषयक पैलू रसिकांसमोर मांडला .

सुमारे दीड तासाचा झालेला हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांनी भरगच्च भरलेल्या आणि भारलेल्या सभागृहात झाला .गेली 40 ते 50 वर्ष संगीत , गायन क्षेत्रात असलेले पंडित विनोदभूषण आल्पे हे तसे अबोल , आत्मप्रौढीपणा पासून खूपच दूर असलेले व्यक्तिमत्व , मूळ मुंबईचे पण लहानपणापासून सतत पुणे शहरात जा – ये असल्याने त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाने जपलेल्या पुणे जिल्ह्यात अनेक उतमोत्तम कार्यक्रम ऐकता ही आले आणि सादर ही करता आले.

इतर अनेक दिग्गज कलावंतांप्रमाणेच आल्पेंची ही सुरुवात ही गणेशोत्सवापासूनच झाली ,सुरवातीला त्यांनी सहज गुणगुणलेल “कळीदार कपुरी पान” ते उत्तम गायक होऊ शकतात हे दाखवून गेले .अर्थात त्यांच्या गळ्यात ताल सुर उपजतच होता (आणि तो असलाच पाहिजे तरच गाता येते ) आणि त्याला आई , वडील , आजोबा यांची दमदार पार्श्वभूमी होती .

आपल्या कार्यक्रमात त्यांनी “रजनीनाथ हा” तसेच पंडित कुमार गंधर्वांचे निर्गुणी भजन , आणि तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अभंग ,याचबरोबरीने सखी मंद झाल्या तारका हे भावगीत आणि डगमगडोले रे ही भैरवी ही रसिकांसमोर सादर केली . आल्पेंच्या गायनाबरोबर च त्यांनी त्या त्या गायकांच्या नकलेचा पेश केलेला छोटासा नमूना ही दाद मिळवून गेला .गायकाला , नटाला उत्तम कला सादर करण्यासाठी सुरूवातीला उत्तम नक्कल करता आलीच पाहिजे असे ते म्हणतात .

नाट्यसंगीत , भावगीत , भक्तीगीत , रागदारी या सर्व प्रकारांवर प्रभुत्व असणार्याआ आल्पे यांनी त्यांच्या त्रिवेणी या कार्यक्रमाचे जवळ जवळ देशभरात 5,000 च्या वर कार्यक्रम सादर केले आहेत . महाविद्यालयीन शिक्षणात त्यांना मुंबई विद्यापीठाची अत्यंत मानाची अशी स्कॉलरशिप ही प्राप्त झाली आहे , याच बरोबर त्यांनी एल आय सी या कंपनी मध्ये 34 वर्ष इमानेइतबारे नोकरी ही केली आहे हे विशेष , लाईव्ह कार्यक्रमाबरोबरच त्यांच्या ध्वनिमुद्रिका ही प्रकाशित झालेल्या आहेत .

गायक जेव्हा गायन कला सादर करायला आलेला असतो तेव्हा तो सर्वात प्रथम स्वताचेच गाणे ऐकायला आलेला असतो असे त्यांचे ठाम मत आहे , संगीताला रियाजाची जरूरी आहेच पण त्याच बरोबर अंगभूत कौशल्याची ही गरज आहे , पंडित कुमार गंधर्वांना त्यांनी दहा वर्ष तंबोर्यातवर साथ ही केली आहे , तो आपल्या आयुष्यातला शिकण्याच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता असे ही आल्पे नमूद करतात .

या कार्यक्रमात संवादिनीची साथ लाभली ती उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची तर तबल्यावर विनय कशेळ्कर यांनी समर्थ साथ केली .शेजार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष श्री उमाकांत कुलकर्णी यांनी सर्व उपस्थित कलाकारांचा सत्कार केला , उपाध्यक्षा सौ .उर्मिला बासरकर यांनी या कार्यक्रमाचे समालोचन करून उपस्थितांचे ,कलाकारांचे आभार मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!