ताज्या घडामोडी

चेंबरवरील झाकणं तुटल्याने अपघाताची भीती

तळेगाव : येथील गाव भागातील जिजामाता चौकात पाण्याच्या पाइपलाईन वरील सात ते आठ ठिकाणी चेंबरची झाकणं तुटल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.काही ठिकाणी ही झाकण अर्धवट तुटली आहेत.तर काही ठिकाणी चेंबरवरील झाकणंच  पूर्ण गायब आहेत.

या रहदारीच्या रस्त्यावर सतत वाहनांची तसेच वृद्ध नागरिक व लहान मुलांची वर्दळ असते. अशा वेळी या उघड्या चेंबरमध्ये पडून अपघात होऊ शकतात. दोनच दिवसांपूर्वी एका चेंबरमध्ये गाड्या अडकून दुतर्फा वाहतूक कोंडी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

पालिकेचे दुर्लक्ष

नगरपालिके पासून अगदी हाकेच्या अंतरावर जिजामाता चौक आहे. तरीदेखील या रस्त्यावर पडलेले खड्डे व तुटलेल्या चेंबरच्या झाकणांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी काम पूर्ण होऊन काही दिवस उलटले आहेत.त्यानंतर संबंधित नगरसेवकांनी कामाची पाहणी सुद्धा केली. तरीदेखील अल्पावधीतच झाकणं तुटल्याने  स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. नवीन पाईपलाईन टाकताना  चेंबरकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

विकास कामे करताना रस्ते खोदले जातात. मात्र काम पूर्ण झाल्यावर संबंधित ठेकेदार रस्ते पूर्ववत करत नाहीत.त्यावरील खड्ड्यात या कामांमुळे भरच पडते. त्यामुळे पालिका आतातरी या कामांकडे लक्ष देऊन काम पूर्ण करून घेणार का? संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारला जाणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!