सोमाटणे येथून रेशनिंगचा विक्रीसाठी ठेवलेला बेकायदेशीर 23 लाखांचा साठा जप्त
सोमाटणे : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने सोमवारी सोमाटणे येथे तब्बल 23 लाखांचा बेकायदेशीर रेशनिंगचा साठा जप्त केला आहे. सोमाटणे येथे बेकायदेशीर विक्रीसाठी धान्य साठविण्यात आल्याची माहिती या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
याप्रकरणी स्वरूप हनुमंत पाटणकर (वय ३८ रा. माळेगाव,पुणे) यांनी रेशनिंग वरील गहू व तांदूळ बेकायदेशीरपणे खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. यासाठी त्याने सोमाटनाफाटा येथील रुद्राक्ष चायनीज अँड रेस्टॉरंट, गणपती मळा येथे साठा करून ठेवला होता.
स्वरूप पाटणकर यांच्या गोदामावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून प्रत्येकी 50 किलो वजनाच्या तांदळाचा 680 गोणी आणि गव्हाच्या 640 गोणी, शिलाई मशीन, आठ रीळ धागा असा एकूण 23 लाख 27 हजार यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे ,सागर शेडगे, सुमित देवकर, खंडणीविरोधी पथकाचे निशांत काळे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.