ताज्या घडामोडी

लोणावळ्यातील 17 नाराज नगरसेवकांनी घेतली आमदारांची भेट

लोणावळ्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेतील 17 नाराज विद्यमान नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत आज मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली आहे.

लोणावळ्यातील काँग्रेसचे सहा, शिवसेनेचे सात तर भाजपमधील नाराज गटातील तीन व अपक्ष दोन अशा एकूण 17 विद्यमान नगरसेवकांनी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यावर उघड नाराजी दाखवत आज असणाऱ्या सभेला गैरहजर राहत नगराध्यक्षां विरोधात आघाडी उघडली आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहाची पंचवार्षिक मुदत आज संपत असून उद्यापासून लोणावळा नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या ताब्यात जाणार आहे.

मागील पाच वर्षे काँग्रेस भाजप सोबत सत्तेत असताना आजच्या शेवटच्या बैठकीत काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेना व भाजपच्या नाराज नगरसेवकां बरोबर आमदारांची भेट घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून लोणावळा शहराचे नाव जगभर पोहोचले आहे.लोणावळ्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मात्र या यशाचे श्रेय घेण्यासाठी रस्सीखेच चालू आहे नगराध्यक्षा एक हाती सत्ता चालवतात, मनमानी कारभार करतात असा आरोप नाराज गट करत असून या गटाचा स्वार्थासाठी हा कारभार चालू आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दिली आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या या भेटीगाठी मुळे लोणावळ्यातील राजकारणाला आगामी निवडणुकीत नवीन दिशा मिळणार का ?लोणावळ्यात बदलाचे वारे वाहणार का? नाराज गट नवीन पक्षात प्रवेश करणार का ?अशी शहरात उलटसुलट चर्चा आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना काही दिवसांपूर्वी नगर विकास खात्याने नोटिसा बजावल्या आहेत.एकूणच तालुक्याच्या राजकारणात अनेक बदल घडताना दिसत आहेत. या बदलत्या  राजकीय घडामोडींचा येणाऱ्या आगामी निवडणुकांत पडसाद उमटणार आहे.

मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना नोटिसा आल्या. तर लोणावळा नगरपरिषदेत स्वपक्षीययांसह पाच वर्षे सत्तेत सहभागी असणाऱ्या काँग्रेसने बंड पुकारले यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!