पुणे – लोणावळा लोकलच्या तीन फेऱ्या पुर्नप्रस्थापित करण्याचा निर्णय
लोणावळा : पुणे लोणावळा लोकलच्या तीन फेऱ्या पुनर्प्रस्थापित करण्याचा निर्णय काल गुरुवार( दि 17 फेब्रुवारी) रोजी घेण्यात आला आहे. कोरोना महामारी चा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने शाळा, कॉलेज, कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहेत. प्रवाशांची वाढती संख्या व त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे – लोणावळा लोकल च्या तीन फेऱ्या पुनर्प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 5 वाजून 45 मिनिटे व 9 वाजून 55 मिनिटे तसेच संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी प्रत्येकी एक लोकल सुरू होणार असून याच लोकल लोणावळा स्थानकातून अनुक्रमे सकाळी 07 वाजून 25 दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी पुण्याकडे रवाना होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता लोणावळ्यातून प्रस्थान करणारी लोकल शिवाजीनगर स्थानकापर्यंतच जाणार आहे.
यापूर्वी प्रवाशांच्या सेवेत लोकलच्या आठ फेऱ्या होत्या. आता आणखीन तीन फेऱ्यांची वाढ झाल्याने दैनंदिन प्रवास करणारे चाकरमाने आणि शाळा-कॉलेजचे विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहे. त्याचबरोबर लोकलच्या सर्व फेऱ्या पूर्ववत करण्यात याव्यात जेणेकरून रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि प्रवास खर्चातही बचत होईल अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.