ताज्या घडामोडी

‘प्रवास अमृत संजीवनीचा’,एका दैवी अनुभूतीचा गणेश मोफत वाचनालयाचा अनोखा उपक्रम.

गणेश मोफत वाचनालयाने आयोजित केलेल्या एका अभिनव कार्यक्रमातून, ‘अमृत संजीवनी’ या कलापिनी निर्मित आणि सृजन नृत्यालय प्रस्तुत महा नृत्यनाट्याचा लेखन संकल्पने पासून ते दूरदर्शन वरील सादरीकरणा पर्यंतचा दृक्श्राव्य प्रवास तळेगावकर रसिकांना अनुभवता आला.

या नृत्यनाट्याच्या संकल्पनेपासून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि अभ्यास पुर्ण नियोजन करून ती संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या सृजन नृत्यालयाच्या संस्थापिका आणि नृत्य अभ्यासिका डॉ.मीनल दिनेश कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरचा ध्येयपूर्तीचा आनंद उपस्थितीत रसिकांना पण सुखावून जात होता.

या समारंभाला तळेगावचे मा. नगर सेवक व आवाज वृत्त समूहाचे सर्वेसर्वा मा.गोपाल परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महा नृत्यनाट्यात सहभागी असलेल्या सर्व पडद्या मागच्या आणि प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणाऱ्या कलापिनी आणि सृजन नृत्यालयाच्या ५० कलाकारांचा गौरव करण्यात आला. मंचावर नाटकाचे संगीत दिग्दर्शक मा. विनायक लिमये,कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, लेखक,दिग्दर्शक डॉ.मीनल कुलकर्णी, तळेगावच्या संगीत अभ्यासक संपदा थिटे उपस्थित होत्या.


या कार्यक्रमात सर्व कलाकारांना बोलते करण्याचे काम तळेगावच्या सुप्रसिद्ध निवेदिका माधुरी कुलकर्णी ढमाले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सूत्र संचालानातून केले आणि कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.

लेखनाच्या संकल्पने पासूनचा प्रवास उलगडून सांगताना डॉ.मीनल कुलकर्णी भावूक झाल्या होत्या त्या म्हणाल्या हे सगळं आम्ही कोणी केले नाही, तर आमच्या कडून ज्ञानेश्वर माऊलींनीच हे करवून घेतले घेतले आहे.या नृत्यनाट्यातील अभंगांच्या नृत्यरचेने मागचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला.
संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक विनायक लिमये यांनी या अभंगाच्या चाली कश्या वेगळ्या आहेत आणि कशा सुचल्या हे सांगताना ते म्हणाले कसं सुचत गेलं हे कळलच नाही आमच्या कडून त्या विश्वात्मक शक्तीने करवून घेतले, पसायदानाची चाल मात्र मुद्दाम वेगळी केली कारण पसायदानात माउलींना ज्ञानेश्वरीच्या पुर्तेतेचा झालेला आनंद, अनुभव सगळ्यांनाच अनुभवता यावा.

डॉ.अनंत परांजपे यांनी या नृत्यनाटकातील गीतांविषयी बोलताना गीतकार दिनेश कुलकर्णी यांच्या शब्द्संपदेचे विशेष कौतुक केले, ते म्हणाले आधी चाल ऐकून त्यावर गीत रचना करण्याचे कौशल्य लाभलेला कवी दिनेश हे आपल्या तळेगावकरांचे भाग्यच आहे.

या नाटकातील तंत्र आणि साउंड ट्रॅक रेकॉर्डिंगची बाजू लीलया पेलणारे कुशल तंत्रज्ञ मंदार थिटे यांनी हे सर्व साउंड ट्रॅक रेकॉर्डिंग त्यांच्या घरातील छोट्याश्या जागेत कसे केले याच्या गमतीशीर आठवणी सांगितल्या व उमलणारे कमळ आणि त्यातून प्रकट होणारी ज्ञानेश्वर माउलींची प्रतिभा या ट्रीक सीनच्या निर्मितीत आलेल्या अडचणी व त्यावर मात करण्यात आलेल्या यशाचे श्रेय माउलींच्या आशिर्वादालाच दिले.
या नाटकाचे आज पर्यंत ३० प्रयोग झालेलं आहेत त्यातील ऑस्ट्रेलियाचा आणि दूरदर्शन वरचा प्रयोग हे दोन प्रयोग हे महत्वाचे आहेतच पण जिथे स्वत: माउलींनी ज्ञानेश्वरी कथन केली त्या नेवाश्याच्या विठ्ठल मंदिरात झालेला प्रयोग, त्यावेळेचे भारावलेले उपस्थित वारकरी आणि आलेली दिव्य अनुभूती…. हे क्षण विलक्षण अद्भुत आणि अविस्मरणीय होते असे डॉ. अनंत परांजपे यांनी सांगितले.

या नाटकात मोठ्या ज्ञानेश्वराची भूमिका करणारा मिहीर देशपांडे याने सांगितले की भूमिका करताना मला मीनलताई कडून कळलेली ज्ञानेश्वरी माझ्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी घटना होती त्या क्षणांपासून माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला आणि माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले.


कार्यक्रमाची सांगता डॉ.मीनल कुलकर्णी यांनी केलेल्या पसायदानाच्या सहज सुंदर निरुपणाने आणि पसायदानाच्या पडद्यावरील दृश्य सादरीकरणाने झाला. उत्तम ध्वनी संयोजन ( केदार अभ्यंकर)आणि दृक्श्राव्य तंत्र ( प्रतिक मेहता) याने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली.

खर तर रंगमंचावर सादर झालेल्या कलाकृतीचे कौतुक सगळेच करतात पण त्या मागचे कष्ट, आलेल्या अडचणी हे रसिक प्रेक्षकांना ज्ञात नसतात. अश्या कार्यक्रमामुळेच त्या रसिकांपर्यंत पोहचू शकतात आणि हे लक्षात घेऊन असा अभिनव कार्यक्रम करणाऱ्या गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर यांच्या कल्पकतेचे आणि त्यांना ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यतीन शहा (उपाध्यक्ष),विक्रम दाभाडे(खजिनदार),रामचंद्र रानडे,पद्मनाभ पुराणिक,अविनाश भेगडे, प्रीतम भेगडे, ललित गोरे, गोरख जगताप, विनया अत्रे(ग्रंथपाल),मानसी गुळूमकर(स.ग्रंथपाल)ललिता गटाने,शोभा दगडे यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!