ताज्या घडामोडी

पं.किरण परळीकर आणि पं.विनोदभूषण आल्पे यांच्या गायनाने तळेगावकर रसिक सुखावले……

कै.पं.शरदराव जोशी यांना गानसुमनांजली...

पं.किरण परळीकर आणि पं.विनोदभूषण आल्पे यांच्या गायनाने तळेगावकर रसिक सुखावले…… कै.पं.शरदराव जोशी यांना गानसुमनांजली…

आवाज न्यूज: विश्वास देशपांडे, तळेगाव दाभाडे ३० ऑगष्ट

श्रीरंग कलानिकेतन व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे यांचा “गुरुपौर्णिमा उत्सव” मागील रविवारी कांतिलाल विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
तळेगावातील संगीत उपासक व गायक पं.किरण परळीकर व सुप्रसिद्ध गायक पं.विनोदभूषण आल्पे यांनी तळेगावचे गानगुरू कै.पंडित शरदराव जोशी यांना गान सुमनांजली अर्पण केली.पं.किरण परळीकर, पं.विनोदभूषण आल्पे , विश्वस्त विश्वास देशपांडे, उद्धव चितळे, बागेश्री लोणकर, सचिव विनय कशेळकर, खजिनदार दिपक आपटे आणि कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली..

पूर्वार्धात पं.किरण परळीकर यांनी बिलासखानी तोडी रागातील स्व-रचित बंदिश ‘जानुना बलमा…. विलंबित ,मध्य आणि द्रुत लयीत सादर करून नारायणा रमा रमणा…हे नाट्यगीत तसेच स्वप्नातल्या फुलांना अजुनी सुवास आहे …..व जिन्दगीने तो सभी…या सुंदर गझला आणि पद्मनाभा नारायणा…..हे भजन सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

उत्तरार्धात पं.विनोदभूषण आल्पे यांनी वृन्दावनी सारंग विलंबित मध्य व द्रुत लयीत सादर केला व आपल्या दमदार आवाजात ‘हे सखी शशीवदने’ हे ललत रागातील नाट्यगीत सादर करून रसिकांची मने काबीज केली. अजुनी रुसून आहे ….हे कुमार गंधर्वांचे भावगीत सादर करून रसिकांची दाद मिळवली आणि ‘अगा वैकुंठीच्या राया….. या सुरेल भैरवीने मैफिलीची सांगता केली.

दोन्ही गायकांनी कै.पं.शरदराव जोशी यांच्या आठवणी सांगून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.
या सुंदर मैफिलीला संवादिनीवर नंदिन सरीन ,दिविज टकले, लक्ष्मीकांत घोंगडे, प्रिया करंदीकर आणि तबल्यावर विनय कशेळकर यांनी तितकीच सुंदर आणि दमदार साथ करून मैफिलीची रंगत वाढविली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्रीरंगचे उपाध्यक्ष राजीव कुमठेकर यांनी केले
या प्रसंगी तळेगावातील तबला गुरु मंगेश राजहंस यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

उत्तम ध्वनि संयोजन सुमेर नंदेश्वर यांचे होते, छायाचित्रण श्रीकांत चेपे यांनी केले. या सुंदर कार्यक्रमाचे उत्तम संयोजन दिपक आपटे, सीमा आवटे, प्रदीप जोशी, राजीव कुमठेकर, किरण पळसुलेदेसाई, अनिरुद्ध जोशी, सुहास धस आणि विनय कशेळकर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!