ताज्या घडामोडी

तळेगाव – चाकण महामार्गावरील खड्ड्याने घेतला आणखी एक बळी

तळेगाव : येथील तळेगाव – चाकण महामार्गावर तोलानी इन्स्टिट्युट समोर झालेल्या दोन कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात शुक्रवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला. वडगाव कडून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचा मृत्यू झाला तर चाकण कडून वडगाव दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा चालक उद्धव नाफडे जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोलानी समोर असलेला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मडेवाड यांनी दिली.

या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत रहदारी सुरळीत झालेली नव्हती. या महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होतात. शेकडो लोकांनी जीवही गमावले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक आंदोलने झाली. परंतु या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीची सार्वजनिक जबाबदारी असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग पाहणी दौऱ्यात व्यतिरिक्त कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे आजतागायत दिसून आले आहे.

या मार्गावर झालेल्या अपघातात शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. तर हजारो नागरिक अधू झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. तळेगाव दाभाडे भागात या महामार्गालगत खोदलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार धरत ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला. मात्र या खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार धरत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!