खुशखबर! आता तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार घरपोच सुधारित सातबारा
वडगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महसूल व वन विभागाच्या तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक भूमीअभिलेख यांच्या निर्देशानुसार मावळ तालुक्यातील 96 हजार 731 शेतकऱ्यांना उद्या (2 ऑक्टोबर ) महात्मा गांधी जयंती पासून सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे मोफत व घरपोच वाटप करण्यात येणार आहे.
2 ते 27 ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेअंतर्गत सातबारा उतारा न मिळाल्यास तो तलाठी कार्यालयात उपलब्ध होईल. उता-यात काही त्रुटी आढळल्यास तात्काळ त्याबाबत अभिप्राय नोंदवून घेण्यात येईल.
मावळ तालुक्यातील 9 मंडळ कार्यालय व 42 तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात सातबारे उतारे वितरित करण्यात येतील. शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.