ताज्या घडामोडी

तळेगावात रंगला “हासरा चंद्रमा” हा कोजागिरी विशेष कार्यक्रम

तळेगाव दाभाडे : ब्राम्हण सर्व सेवा संघ , बहुभाषिक ब्राम्हण संघ व वानप्रस्थाश्रम ह्या तीन ही संस्थांनी एकत्र येऊन “हासरा चंद्रमा” या अवीट गोडीच्या गीतांची मेजवानीच रसिकांसमोर सादर केली , निमित्त होते कोजागिरीचे.वानप्रस्थाश्रमाच्या पटांगणात हवेच्या गारव्यात आणि चंद्राच्या शीतल चांदण्यात हा कार्यक्रम रंगतच गेला .

ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले कलावंत एकसे एक दर्दी आणि नावाजलेले होते ,ज्यात जेष्ठ गायक पंडित विनोदभूषण आल्पे ,ख्यातनाम गायिका श्रीमती बकुल पंडित , पंडित सुरेश साखवळकर , श्री प्रकाशराव जोशी , श्री सुरेश कुलकर्णी ,सौ श्रुति देशपांडे , कीर्तनकार ह भ प शेखरबुवा व्यास आदि सहभागी होते .
तळेगावचेच सुपरिचित कीर्तनकार ह.भ .प . शेखरबुवा व्यास यांनी मुरलीधर श्याम व घेई छंद मकरंद ही नाट्यगीते सादर केली , श्री प्रकाशराव जोशी यांनी पंढरी निवासा व राजस सुकुमार मदनाचा पुतळा ही भक्ति गीते सादर केली , श्री सुरेश कुलकर्णी यांनी माझे माहेर पंढरी व आम्हा घरी धन हे अभंग , तर सौ श्रुति देशपांडे यांनी अबीर गुलाल आणि गर्द सभोती रान साजणी ,तर पंडित विनोद भूषण आल्पे यांनी माझा भाव तुझे चरणी आणि रजनी नाथ हा ,ही गीते सादर केली , सुप्रसिद्ध गायिका सौ बकुल पंडित यांनी त्यांच्या मूळ सुरावटीतले “उगवला चंद्र पुनवेचा” हे गीत सादर करत रसिकांची वाहवा मिळवली तर त्याचबरोबर हे आदिमा हे अंतिमा हे गीत ही सादर केले . तर पंडित सुरेश साखवळकर यांनी हे सुरांनो चंद्र व्हा आणि हरिनाम बिना ही गीते आपल्या सुमधुर शैलीत सादर केली .

या कार्यक्रमाला सुरेल साथ लाभली ती म्हणजे ऑर्गन वर होते हिमांशु जोशी तर तबल्याची साथ केली श्री केदार कुलकर्णी यांनी केली. तर टाळाला होते श्री सुरेश कुलकर्णी .तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत भाषेच्या जेष्ठ शिक्षिका आणि लेखिका श्रीमती ललिता जोशी यांनी केले . विशेष उल्लेखनीय म्हणजे या कार्यक्रमाच्या सुरवातीला कुमारी स्वरा माळी (वय वर्ष 7 ) हिने “अवघे पाऊणशे वयोमान” हे गीत खुमासदार शैलीत सादर केले .

श्री सुधाकर देशमुख यांनी सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .तर सर्व सहभागी कलाकारांचे आणि विशेषता साप्ताहिक अंबरचे संपादक आणि जेष्ठ गायक पंडित सुरेश साखवळकर यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल सौ उर्मिला छाजेड यांनी आभार मानले.सर्वच कलाकारांचा संस्थांच्या मार्फत यथोचित सन्मान करण्यात आला .

इतक्या सुरेल कार्यक्रमाची पर्वणी मिळाल्यामुळे उपस्थित असलेले रसिक श्रोते अक्षरशा तृप्त झाले होते. त्याचबरोबर कोजागिरीच्या बरोबर संकष्टीही आल्याने श्रोत्यांना मसाला दूध आणि उपवासासाठी चिवड्याची पाकिटे ही देण्यात आली . त्याचा ही आनंद श्रोत्यांनी व्यक्त केला.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!