वडगाव मावळमध्ये पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
लाचप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला रंगेहात अटक
मावळ : येथील तालुक्यातील साते गावातील ग्रामपंचायत सदस्याला 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सरपंच मात्र फरार झाला आहे. भंगार दुकानाच्या नाहरकत परवान्यासाठी ही लाच मागितली गेली होती.
ऋषीनाथ आगळमे असे अटक केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात तक्रारदाराने साते गावात भंगाराचे दुकान सुरू केले होते. त्याच्याविरोधात ग्रामपंचायतीत तक्रार करण्यात आली. सरपंचाने दुकानदाराला बोलवून दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्यासाठी दुकानदाराने अर्ज केले असता परवाना देण्यासाठी त्याच्याकडून दीड लाखाची मागणी केली.
तक्रारदारांने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर रविवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लाचलुचपत विभागाने सापळा रचत ऋषिकेश आगाळमे याला 1 लाखाची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. याची कुणकुण सरपंचाला लागल्याने तो फरार झाला आहे.