ताज्या घडामोडी

डॉ.भंडारी यांच्या जागर चिंतनाचा व झुळूक या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न

तळेगाव : येथे शुक्रवार (12 नोव्हेंबर ) रोजी डॉ. शाळीग्राम भंडारी लिखित जागर चिंतनाचा भाग 1,2 आणि झुळूक या तिन्ही पुस्तकांचा शानदार प्रकाशन समारंभ “भंडारी विला” मुंबई – पुणे रोड या ठिकाणी संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर,प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक वक्ते  द्वारका जालान, जळगावस्थित दीपस्तंभसंस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन आणि विशेष अतिथी डॉ. दीपक भाई शहा, शैलेश शहा, महेशभाई शहा, मुंबई दूरदर्शनचे संचालक अश्विनीकुमार, प्रसिद्ध उद्योगपती श्रीमान हरीनारायणजी भुतडा आणि लेखक शाळीग्राम भंडारी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डॉ. सोनाली जेथलिया यांनी व्यासपीठावरील आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे भंडारी परिवारातर्फे मनःपूर्वक स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकात मावळ साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्राचार्य सुरेश अत्रे यांनी लेखक डॉ. शाळीग्राम भंडारी यांचा आत्तापर्यंतचा साहित्य प्रवास आणि या तीनही पुस्तकांच्या मागील डॉक्टरांची भूमिका अतिशय अर्थपूर्ण मोजक्या शब्दात व्यक्त केली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते तीनही पुस्तकांचं अत्यंत प्रसन्न आणि पवित्र मंत्रोच्चाराच्या स्वरात प्रकाशन समारंभ पार पडला.

लेखक डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी अर्जुन, शोभा, अक्षय व विद्या या गायकवाड कुटुंबियांचं जागर चिंतनाचा भाग एक व दोन- या दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीस मोलाची मदत केल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

त्याबरोबरच झुळूक पुस्तकासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सामान्य व्यक्तिमत्वात असलेला असामान्य गुण या पुस्तकातून प्रगट केलेला आहे याचा उल्लेख केला. आपल्या जीवन प्रवासात अनेक स्तरावर साह्यभूत असणारे माहेश्वरी परिवार,लायनपरिवार आणि शालेय जीवनातील मित्रपरिवार यांच्याविषयी डॉक्टर भंडारीनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

ज्यांनी भंडारी विला या वास्तू निर्मितीचा प्लॅन काढला त्या  ऋतुजा वाडेकर ,पुस्तकांची प्रस्तावना ,मांडणी, शीर्षक यासाठी मोलाची मदत करणारे प्राचार्य सुरेश अत्रे ,लेखनिक  विठ्ठल गोंधळेकर आणि पुस्तकांचे मुखपृष्ठ अतिशय कलात्मक कौशल्याने सजवणारे  दिनेश फल्ले आणि अक्षय गायकवाड यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

जालनाचे सुप्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. राजीव जेथलिया यांनी अत्यंत समर्पक शब्दात महाजन सरांची ओळख करून दिल्यानंतर महाजन सरांनी डॉ. शाळीग्राम भंडारी आणि त्यांच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती ही भगवद्गगीतेतील  “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा नकरता सतत कार्यरत असतात याचा आम्हा नवीन पिढीला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच नवीन पिढी अशाच आदर्श मार्गावर चालण्याचा प्रयत्न निश्चितच करील असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.

द्वारका जालान यांनी अत्यंत खेळकर खुसखुशीत विनोदाची पेरणी करुन आनंदी यात्रीचीच गुरुकिल्ली आपल्या संबोधनातून सादर केली. सुरुवातीलाच व्यक्त केलेल्या अध्यक्षीय भाषणात  सुरेश साखवळकर यांनी जागर चिंतनाच्या या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन झालं हे घोषित केल्यानंतर आपल्या गेल्या चाळीस वर्षाच्या डॉ. भंडारी यांच्या सहवासात अनुभवलेले अनेक प्रसंग सांगून डॉक्टरांच्या रसिक स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.त्यामुळेच पुढे प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून कार्यक्रमाची हळूहळू रंगत वाढत गेली.

प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर ईश्वरझंवर यांनी सर्व उपस्थितांचे भंडारी परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानले.अत्यंत देखण्या अविस्मरणीय अशा या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाचे उत्तम नियोजन, आयोजन संचलन केल्याबद्दल  राधेशाम भंडारी आणि डॉ. दिपाली झंवर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

त्यानंतर सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुग्रास भोजना बरोबरच उत्तम विचारांच्या शिदोरीची अनुभूतीच विलक्षण समाधान समारंभातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!