ताज्या घडामोडी

साने गुरुजींचे साहित्य तर आदर्श,मानवतावादी मुल्ये, नीतीचारित्र्य संस्कार,समानता अशी संस्काराची पाठशाळा होती

माझे आवडते पुस्तक , श्यामची आई ; मातृप्रेमाचे महनमंगल स्तोत्र

लेखक – सुप्रसिद्ध लेखक विजय भदाणे, नाशिक

नाशिक : माझ्या मनावर 1970 च्या दशकापर्यंतच्या थोर साहित्यिकांच्या साहित्याचा पगडा आहे. त्या काळातील साहित्याकांची साहित्यसंपदा आवडीने वाचणे हा माझा छंदच! ते सर्वच साहित्य हे अभिजात वाड्मय व संस्कारक्षम साहित्य आहे.पूज्य साने गुरुजी ,पंडित महादेव शास्त्री जोशी,य गो जोशी या सारख्या सारस्वतांचे साहित्य.

आदर्श,नीती,चारित्र्य,संस्कार.  ही जीवनमूल्ये, कुटुंब,समाज,गावगाडा,मानवता यांचा जीवनाभुव यावर आधारित होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या घराघरात ती आवडीने वाचली जात व त्यावेळच्या शालेय अभ्यासक्रमात ती समाविष्ट असल्याने विद्यार्थी वर्गाकडून ती अभ्यासली जात असत.त्यामुळे सामान्य मराठी वाचक ते कधीच विसरू शकत नाही.

पांडुरंग सदाशिव साने गुरुजींचे साहित्य तर आदर्श, मानवतावादी मुल्ये, नीतीचारित्र्य संस्कार,समानता अशी संस्काराची पाठशाळा होती.” श्यामची आई ”  या सारखे अद्वित्यीय पुस्तक लिहून त्यांनी” आई”हा शब्द चिरंतन केला. मातृप्रेमावरील हे मराठीतील एकमेव अद्वित्यीय किंबहुना न भुतों भविष्यती म्हणून ख्यातकीर्त आहे.. माधुर्य,मांगल्याने भरलेले,करूण व प्रेम रसाने ओतप्रोत भरलेले,माया ममता भावाने ओथंबलेले मातृप्रेमाचे महन मंगल स्तोत्रच साने गुरूजीनी वाचका हाती दिले आहे.

ज्ञानेश्वर  म्हणतात तसे अमृताशी स्पर्धा करणाऱ्या मराठीच्या भाषा वैभवाचा शुद्ध निर्मळ असा झरा या पुस्तकाच्या पाना पानातुन झुळझुळत असल्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येत असतो अशी त्याची थोरवी आहे.याला कारणही तसेच आहे.पुज्यनिय साने गुरुजींनी हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहून काढले आहे.गुरुजींचे गहिवरलेले अंतकरण, डबडबलेले डोळे,दाटून आलेला कंठ दाबून ठेवलेला हुंदका व हृदयातून निघालेली शुद्ध,ओघवती शब्दगंगा याची प्रत्यक्षात प्रचिती वाचकाला येते. पुस्तकातील प्रत्येक ओळ न ओळ,प्रत्येक वाक्य न वाक्य वाचताना भावव्याकुळतेने डोळ्यातुन अश्रू वाहत असतात.अगदी पाषाणहृदयी व्यक्तीदेखील यातील मन हेलावून टाकणारे प्रसंग,घटना वाचुन रडल्याविना राहाणार नाही!

एकूण 42 गोष्टी श्यामची आई या पुस्तकात आहे.श्यामच्या दैनंदिन जीवनातील लहान सहान प्रसंग,अनेकाविध घटना,अनुभव यांचे हृदयस्पर्शी चित्रण यात आहे.लहानग्या श्यामला स्नान घातल्यांनातर त्याला “देवाच्या पाया पडून ये!” असे आई सांगते.त्यावेळी”माझे तळवे ओले आहे
त्यांना माती लागून ते खराब होतील!” असे प्रत्युत्तर श्याम देतो.तेव्हा आई म्हणते “श्याम पायाला घाण लागू नये म्हणून इतकी काळजी घेतो तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप ! ”

श्याम शालेय विद्यार्थी असतानाची गोष्ट.त्याचे डोईवरचे वाढलेले केस बघुन त्याचे वडील ते काढण्यास
सांगतात . श्यामला ते रुचत नाही.यावेळी आई त्याला समजावते की वडिल तुमच्यासाठी खूप काही करतात,तुम्हाला जपतात, ,कुटुंबाची काळजी घेतात.तर मग तु देखील केस वाढविण्याचा मोह टाळ व त्यांचा आदर ठेव!शेवटी धर्म म्हणजे काय ? तर मोहाचा त्याग करणे म्हणजे धर्म होय! धर्माची एव्हढी सुटसुटीत, सोपी,सुलभ व रुचेल आणि पटेल अशी व्याख्या श्यामची जगावेगळी महान आईच करू जाणे!

खरोखर श्यामची आई हे पुस्तक आपल्या संग्रही तर
असावेच. परंतु उगवत्या आधुनिक पिढीवर संस्कार होण्यासाठी त्यातीलअमृतमय गोष्टी जरूर सांगाव्यात इतकी थोरवी “श्यामची आई”या पुस्तकाची आहे हे निश्चित !

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!