कामशेत : कामशेत ही सत्तर गावांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. कामशेत परिसरात आजूबाजूच्या गावातील नागरिकांची नेहमीच येथे वर्दळ पाहायला मिळते. कामशेत नगरीमध्ये मागील काही वर्षांपासून रस्ते काँक्रीटीकरणाचा घाट घातला जात आहे. असाच कामशेत मधील माऊली नगर रस्ता जो मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित होता त्याचे आता काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे परंतु तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.
कामशेत मधील नवीन उकसान व माऊली नगर भागाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहे. मागील सुमारे 15 दिवसांपूर्वी ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने माऊलीनगर व नवीन उकसान वासीयांना खाजगी पर्यायी रस्त्याचा उपयोग करावा लागत आहे.
जवळपास 2 किलोमीटरचा वळसा
माऊलीनगर भागाकडून कामशेत बाजारपेठेकडे येण्यासाठी जवळपास 2 किलोमीटर चा वळसा घालून खाजगी रस्त्यावरून वाहने वळवावी लागत आहेत. त्यामुळे आम्ही आता किती दिवस लांबून प्रवास करायचा असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत.