स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
तळेगाव : श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये आज शनिवार ( दि. 19 फेब्रुवारी) रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका मा.सौ.शमशाद शेख मॅडम व शिक्षकवृंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याठिकाणी शाळेतील सर्व बाल मावळे उपस्थित होते.
‘शिवजयंती’ चे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पोवाडा गायन स्पर्धा,गीत गायन स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवरायांचा, जिजाऊंचा, मावळ्यांचा पेहराव करून या व्यक्तिरेखा सादर केल्या. शिवाजी महाराजांचे कार्य उलगडणारे पोवाडे सादर केले. वातावरण ‘शिवमय’ झाले होते . विद्यालयाचे सहशिक्षक श्री.दिलीप काळे यांनी शिवचरित्र सांगून शिवतत्व आत्मसात करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.शमशाद शेख मॅडम यांनी महाराजांचा इतिहास समजून घेऊन आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे; त्यातून आपल्या आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध होऊ शकतो असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका मा.सौ.शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका मा.सौ.रेणू शर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रुपाली कांबळे, सौ.विजयमाला गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले .
या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री संतोष खांडगे, सचिव मा. श्री मिलिंद शेलार सर, शालेय समिती अध्यक्षा मा. सौ रजनीगंधा खांडगे मॅडम यांनी करून सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.’जय भवानी ; जय शिवाजी ‘ जय घोष करत कार्यक्रम संपन्न झाला.