मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी गणेश खांडगे यांची निवड
तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश खांडगे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही निवड जाहीर केली.
काही दिवसांपूर्वी पदाचा कार्यकाळ संपल्याने व नवीन कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची संधी मिळावी यासाठी माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर तालुका अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आज खांडगे यांची या पदी वर्णी लागली.
गेल्या तीस वर्षापासून खांडगे हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आत्तापर्यंत त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन त्यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावर निवड करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आपणा सर्वांच्या सहकार्याने करावयाचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न राहतील असा मला विश्वास आहे असे गारटकर म्हणाले.