छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरक्षारक्षकाची नेमणूक करा ; अन्यथा तीव्र आंदोलन करू – हिंदू समिती
लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोणावळा शहरात आहे.या पुतळ्या भोवती असणारी सुरक्षा भिंत अतिशय कमी उंचीची आहे. त्यामुळे या भिंतीवरुन अनेक जण उड्या मारून या परिसरात येतात. येथील पवित्रता भंग करतात. या परिसराचे पावित्र्य राखले जावे यासाठी येथे 24 तास सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांनी नगर परिषदेकडे केली आहे. यापूर्वी देखील 16 मार्च रोजी याबाबत नगरपरिषदेला पत्र देण्यात आले होते. मात्र याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या आठवडाभरात या परिसराच्या सुरक्षिततेबबत निर्णय न झाल्यास लोणावळा नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे.
नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात पुतळा परिसरात सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी तसेच सुरक्षा भिंतीवर तार लावून घ्यावी अशी मागणी हिंदू समितीने केली आहे. याबाबत आठ दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.