ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड शहरातील ८५ टक्के ओला व सुका कच-याचे योग्य पध्दतीने वर्गीकरण – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी : देशातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि निरोगी, सुंदर शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान देशपातळीवर राबविले जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभियानात सहभाग नोंदविला आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध योजना आखण्यात आल्या आहेत.

अभियानाला शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, पर्यावरण संघटनांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ८५ टक्के ओला व सुका कच-याचे योग्य पध्दतीने वर्गीकरण करण्यात महापालिका यंत्रणा यशस्वी ठरली आहे. कदाचित, इतक्या मोठया प्रमाणात कचरा संकलीत करून त्याचे वर्गीकरण करणारी पिंपरी चिंचवड महापालिका एकमेव असेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे

. ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे बुधवार, दि. ६ मार्च रोजी आयोजित कार्यशाळेवेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सध्या आपले शहर “स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये” सिटीझन फीडबॅक कॅटेगिरीत पहिल्या ५ शहरांमध्ये आहे. आपल्याला शहर पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी शहरातील नागरीक, शालेय विद्यार्थी, सामजिक संघटना, पर्यावरण संघटना, आरोग्य सेवक, शासकीय – निमशासकीय संस्था, महिला बचत गट, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायटया आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आहे.

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे. मनपा क्षेत्रिय कार्यालयांच्यावतीने रॅली, पथनाटय, स्वच्छता गीतांद्वारे जनजागृती मोहिम राबवून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनाचे व कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विषद करण्यात येत आहे. यातून होम कंपोस्टिंग करत कंपोस्ट मधून टेरेस गार्डन तयार करण्याची संकल्पना उभारणीस आली आहे. घरगुती होम कंपोस्टींग बिन ५० टक्के अनुदान देण्यात आले आहे.

बचत गटातील महिलांनी घरातील व परिसरातील कचरा समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.स्वच्छतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून सर्व क्षेत्रिय कार्यालयांद्वारे जागृती केली जात आहे. क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून रात्रंदिवस शहर परिसर स्वच्छ केले जात आहे. पुढील दहा दिवस चोखपणे कामगिरी बजावून https://bit.ly/PSSSwachhSurvekshanFeedback या लिंकद्वारे नागरिकांचा सकारात्मक फीडबॅक नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. पिंपरी शहराला देशपातळीवर नावलौकीक मिळवून देण्यासाठी नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!