ताज्या घडामोडी

विधान परिषद २०२२ ; कशी होते विधान परिषदेची निवडणूक. 

विजयासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने कंबर कसल्याने याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

विधान परिषद २०२२ ; कशी होते विधान परिषदेची निवडणूक.

आवाज न्यूज:विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । आता विधान परिषदेकडे उभ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यासाठी 20 जून रोजी मतदान होणार असून, प्रकांड पंडितांच्या या सभागृहात प्रवेश करण्यासाठी एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावतायत. विजयासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने कंबर कसल्याने याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

हे उमेदवार रिंगणात
विधान परिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांचा समावेश आहे. भाजपने पाच उमेदवार उभे केलेत. त्यात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड आहेत.

‘मविआ’चे संख्याबळ
महाविकास आघाडीकडे एकूण 152 आमदार आहेत. त्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसकडे 44 जण आहेत. विजयासाठी प्रत्येकाला 27 मते लागतील. त्यामुळे 6 उमेदवार जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज असेल. सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र, काँग्रेसने दोन उमेदवार उभे केलेत. हा दुसरा गडी जिंकण्यासाठी पक्षाला अजून 10 मतांची गरज आहे.

भाजपचे आकड्याचे गणित
भाजपच्या पारड्यात 106 आमदार आहेत. अपक्षांची मदत घेतली, तर हे संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्याच्या जोरावर 4 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र, 5 वा उमेदवार जिंकण्यासाठी भाजपला अजून 22 आमदारांची मते मिळवावी लागतील. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली. त्यात 12 अपक्षांनी पाठिंबा दिला. हे संख्याबळ आपण भाजपच्या पारड्यात धरले तरीही अजून 12 मतांची सोय पक्षाला करावी लागेल.

गुप्त मतदान पद्धती
विधानसभेच्या 288 सदस्यांमधून विधान परिषदेचे 10 सदस्य निवडून द्यायचेत. त्यासाठी मतदान गुप्त होते. पक्ष व्हीप काढतात, मात्र ते पक्षाच्या एजंटांना दाखवायचे नसते. त्यामुळे इथे राज्यसभेसारखे उघड नव्हे, तर गुप्त मतदान पद्धती आहे. आता या 10 उमेदवारांना जिंकण्यासाठी प्रत्येकी 27 मते हवीत. प्रत्येक मताचे मूल्य 100 असते. म्हणजे 2800 मते मिळणारा उमेदवार विजयी होतो. मात्र, मतदान कमी झाले, तर कोटा कमी होऊ शकतो.

असे होते मतदान
आमदारांना मते देताना 1, 2, 3, 4 असे पसंतीक्रम द्यावे लागतात. यात 1 नंतर 2 पसंती क्रमांक दिला नाही, तर त्याने दिलेले पुढचे पसंती क्रमांक बाद होतात. मतदार कळावा यासाठी मतपत्रिकेवर काही चिन्ह, खूण केल्यास किंवा अनेक मतदारांनी कोपऱ्यात, उजव्या-डाव्या बाजूस पसंती क्रमांक दिल्यास आणि हा पॅटर्न असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवल्यास त्या मतपत्रिका बाद केल्या जाऊ शकतात. मतदान करताना पसंती क्रमांक म्हणून रोमन, मराठी, इंग्रजी अंक टाकता येतात. मात्र, देवनागरी किंवा इतर भाषेत अक्षरी पसंती क्रमांक दिले, तर मत बाद होते.

समान मते पडल्यास
शेवटच्या फेरीत दोन्ही उमेदवारास समान मते पडल्यास, ज्या उमेदवारास पहिल्या पसंतीची मते अधिक आहेत त्याला विजयी घोषित केले जाते. आजारी मतदाराला मतदान करण्यास साहाय्य हवे असल्यास मतदार नसणारा कोणीही मदत करू शकतो किंवा निवडणूक निर्णय अधिकारीसुद्धा मतदान करू शकतो. निश्चित केलेला कोटा शेवटच्या उमेदवाराने पूर्ण केला पाहिजे असे नाही. एक-दोन मते कमी असणारा उमेदवार विजयी होऊ शकतो. विधानसभेत 288 अधिक एक अँग्लो इंडियन सदस्य अशी 289 सदस्यांची संख्या आहे. मात्र, सध्या नामनियुक्त सदस्य निवडण्याची पद्धत बंद आहे. त्यामुळे विधानसभा 288 सदस्यांची आहे. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. त्यात 27 चा कोटा पूर्ण करणारे उमेदवार विजयी म्हणून घोषित केले जातात.

…तर मते ट्रान्सफर
दुसऱ्या फेरीत ज्या सदस्याला कोट्याच्या वर सर्वाधिक मते मिळाली आहेत त्याच्या मतपत्रिकेत ज्यांना दुसरा पसंती क्रमांक दिला आहे, त्यांना ट्रान्स्फर केली जातात. त्यानंतर कोट्यावर अधिक मते असणाऱ्या पुढच्या उमेदवाराला मते ट्रान्स्फर करण्यास घेतली जातात. एखाद्यास 28 मते मिळाली आहेत. विजयासाठी 25.51 कोटा आहे. 2800 वजा 2551 = 209 मतमूल्य होते. 209 भागिले 28 = 7.46 मते अतिरिक्त झाली. 28 गुणिले 10 = 196 मते होतात. ती पुढच्या उमेदवारास वळवण्यात येतात.

कोण किती जागा जिंकेल?
सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजप चार जागा सहज जिंकू शकते. मात्र, पाचवी जागा जिंकण्यासाठी पक्षाला 130 मते लागतील. सध्या भाजपचे संख्याबळ 106 आहे. काही अपक्ष आमदार बरोबर आहेत. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची 123 मते मिळाली. आता विधान परिषदेसाठी गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे त्यात वाढ होऊ शकते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसने बाहेरच्या मतांवर दुसरा उमेदवार उभा केला आहे. विधान परिषदेत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 25.91 मतांची गरज असेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!