निपाणी नगरी वृत्तसेवा..(31)
निपाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सकाळी ९ वाजता भव्य सोहळ्याचे आयोजन.
निपाणी शहरातील मराठा समाजाच्या सामाजिक व व्यावसायिक एकतेचे प्रतीक असलेल्या मराठा व्यवसाय संघ, निपाणी (भारत) यांचा १० वा वर्धापन दिन सोहळा आज रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरा होत आहे.
निपाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सकाळी ९ ते ३ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, थोड्याच वेळात कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे, संघाच्या कार्याचा आढावा, तसेच यशस्वी उद्योजकांचा सत्कार अशा बहुआयामी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवसाय, उद्योग, स्टार्टअप आणि संघटनात्मक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याने व्यवसायिक, युवक व नवउद्योजकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार सकाळी स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शिववंदना व शिवगर्जना, संघाची माहिती, आजपर्यंतच्या कार्याचा आढावा, कार्यकारिणी व एडमिन टीमची ओळख करून देण्यात येणार आहे.
तसेच “व्यवसायवृद्धी आणि आत्मनिर्भरता” या विषयावर प्रसिद्ध वक्ते व व्यवसाय मार्गदर्शक मा. श्री. रविंद्र खैरे (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दुपारच्या सत्रात यशस्वी उद्योजकांचा सन्मान, त्यानंतर स्नेहभोजन, प्रदर्शन व खरेदी-विक्रीचे स्टॉल्सही खुले राहणार आहेत. आपले व्यावसायिक स्टॉल व जाहिरात बोर्ड लावण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यास निपाणी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा व्यवसाय संघ, निपाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
— निपाणी नगरी