ताज्या घडामोडी

स्वार्थ, अहंकार, माणसाला माणसापासून दूर नेतो.. प.पू.श्री. ध्यानसागर महाराज साहेब.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिंचवड येथील प्रतिभा कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालय आणि अनाम प्रेम परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म सोहळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यात्म :   स्वार्थ, अहंकार, माणसाला माणसापासून दूर नेतो.. प.पू.श्री. ध्यानसागर महाराज साहेब.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ४, जानेवारी, २०२३.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिंचवड येथील प्रतिभा कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालय आणि अनाम प्रेम परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म सोहळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विद्यार्थींना मार्गदर्शन करताना श्री महाराज साहेब बोलत होते.

सर्व धर्म सोहळा कार्यक्रमासाठी मुस्लिम धर्मगुरु मौल्लाना शकूर, ख्रिश्चन धर्मगुरु फादर राजेंद्र कदम, संस्थेचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, राष्ट्रीय सेवा योजनाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्लेषा देवळे, प्रा. सुक्लाल कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायिक प्रा. अशोक पगारिया, अनाम प्रेम परिवार संस्थेचे अनिल मोरे, पंडीत शिकारे, महेश सोनटक्के, पल्लवी जोशी, रसिका देशपांडे, ज्योती सातपुते समवेत प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

प.पू.श्री. ध्यानसागर महाराज साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले, सर्व धर्माच्या भाषेत अमृतवाणी आहे. ज्यात सगळ्या मानवजातीच्या हिताची गोष्ट आहे, ती परमेश्वर निर्मित आहे. दोन समाजात भिंती निर्माण करणारी गोष्ट ही मानव निर्मितच आहे. जन्मताच कोणी वाईट नसतो. अहंकार माणसाला माणसापासून दूर नेतो. माणसाच्या मनात प्रेम, करूणा जागृत करण्याची आज आवश्यकता आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचे रक्त लाल आहे. सर्वजण पाणी एकच पितो, निसर्ग निर्मित हवेचा श्वास आपण घेतो म्हणजे आपण एकच आहोत. आज देशात एकता महत्वाची आहे, त्यातूनच जगात शांतता नांदेल, असे शेवटी प्रबोधन केले.

फादर राजेंद्र कदम म्हणाले, प्रत्येक धर्म मार्गदर्शन करते देवाचे अनेक नावे प्रकार असले तरी परमेश्वर निस्वार्थी प्रत्येकावर प्रेम करतो. मनुष्याने देखील प्रत्येकावर प्रेम करावे. जीवनाच्या बाबतीत अनेक लोकांचा गोंधळ होतो. जीवन परमेश्वराचे बक्षीस आहे. समाज समाजात आनंदी वातावरण निर्माण केले पाहिजे. एकमेकांचा आदर सन्मान केला पाहिजे. मनुष्य धर्म सर्वात मोठा असून, आज खून, मारामारी मुळे मनुष्य भयानक वृत्तीकडे जात आहे का? असा भेडसावत आहे. जो ज्या परमेश्वराला मानतो त्याने त्याची प्रार्थना करावी. एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करा. प्रत्येक धर्म उत्तम प्रकारे शिकवण देतो. नागरीकांनी आजारी रुग्ण निराधार, वंचितांच्या मदतीसाठी पुढे या आज युवापिढी समोर सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले, याबद्दल प्रतिभा महाविद्यालयाचे आभार मानतो.

मौल्लाना शकूर म्हणाले, अल्लाहने मुस्लिम समाजाला मानवता, शांती व भाईचार्‍याचा संदेश दिला आहे. प्रत्येकाने मानवसेवा आपल्या घरातूनच सुरु केली पाहिजे. घरातील लोकांचा हक्क डावलून स्वतःचे हीत पाहता कामा नये. मनुष्य हा प्रेमाचा भुकेला आहे. आज समाजकंटक शांतीभंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाज समाजात भेद निर्माण करीत आहे. यापासून युवा पिढीने दूर राहिले पाहिजे. कितीही कठीण प्रसंग आला तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही, असा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. देवाचे भय असले पाहिजे भाईचारा नसेल तर, शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल यावेळी उपस्थित करून प्रसंगी उठाव हा माणसाबरोबर असता कामा नये, तर तो समाज कंटकाबरोबर असला पाहिजे. जातपात नष्ट होवून देशाचा विकास व्हावा, अशी प्रार्थना केली.

प्रास्ताविकात अनाम प्रेम परिवारचे अनिल मोरे म्हणाले, सर्व धर्मा आधी माणूस धर्म आहे, सर्व धर्म सोहळा निमित्त एकत्रित राहण्याचा संदेश देण्यासाठी नववर्षाचे औचित्य साधून सदर उपक्रम राबविला आहे. तो प्रत्येकाने स्विकारावा. आज समाजात वादविवाद भांडणे आदी प्रकार समाजकंटका करवी होत आहे. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. नवीन वर्षात युवापिढीने संकल्प करून माणूसकी धर्म अंगिकारून एकमेकांबरोबर प्रेमाने राहू यात हा संदेश देण्यासाठी सर्व धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. प्रा. अशोक पगारिया म्हणाले, समाजातील आजची परिस्थिती पाहता सर्व धर्म सोहळा सारखे उपक्रमे विविध भागात राबविण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक धर्मात मानवतावादी शिकवण आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे व संस्थेचे आभार मानले.प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातील विद्यार्थ्यांनी कवि साने गुरुजी लिखीत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना म्हटली. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद उपस्थितांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका देशपांडे यांनी केले, तर आभार प्रा. आश्लेषा देवळे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!