ताज्या घडामोडी

निर्भीड व आदर्शवादी पत्रकार हरपला..

पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.

 निधन वार्ता.  निर्भीड व आदर्शवादी पत्रकार हरपला

पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी, २३ जानेवारी.

विजय भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यातील एक निर्भीड व आदर्शवादी पत्रकार हरपला असल्याची प्रतिक्रिया मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

विजय भोसले यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी आज सकाळी वायसीएम हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. पत्रकारितेला वाहून घेतलेले आयुष्य ते शेवटच्या श्वासापर्यंत जगले आहेत. अतिशय निर्भीड आदर्शवादी व अभ्यासू पत्रकार म्हणून राज्यभरात त्यांची ओळख होती. स्पष्ट वक्तेपणा व सडेतोडपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आपल्या करारी भूमिकेमुळे त्यांनी राजकारणात चुकीची भूमिका घेणाऱ्या नेत्यांना त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांना कधीच माफ केले नाही चुकीचे वागणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या तोंडावर बुरखा पाडण्याचे काम विजय विनायकराव भोसले यांनी केले.

गेली ४१ वर्षे ते पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता करत होते त्याचबरोबर केसरी वृत्तपत्रासाठी विधिमंडळ वार्तांकनाचे कामही ते पार पाडत होते मुंबईतही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला होता राज्यातील आमदार असो की मंत्री असो की कोणीही शासकीय अधिकारी अथवा सचिव असो प्रत्येकालाच विजय भोसले यांच्या आदर्शवादी स्पष्ट वक्तेपणाचा अनुभव आला आहे असे असले तरी राज्यात विजयरावांच्याबद्दल आपुलकी आणि आदर खूप मोठ्या प्रमाणावर होता.

विजय भोसले हे पत्रकारितेबरोबरच अत्यंत व्यासंगी कलावंत होते त्यांना हिंदी चित्रपटातील गाणी गाण्याचा छंद होता आयुष्यातील सुरुवातीच्या काळात काही का त्यांनी ऑर्केस्ट्रा मध्ये गाणी गायली वयाच्या ६२ व्या वर्षीही त्यांचे राहणीमान व त्यांची केशभूषा यावरून त्यांना देवानंद किंवा चॉकलेट हिरो म्हणूनही अनेक जण ओळखत होते.
भोसरी परिसरात एका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब मुलांना घडविण्याचे देखील काम पार पाडले आहे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात विजय भोसले यांचा सिंहाचा वाटा होता चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या कामावर त्यांनी कायम हातोडा मारला चुकीच्या व्यक्तीला कधीच पाठीशी न घालता या शहरासाठी म्हणून व सर्वसामान्यांसाठी म्हणून त्यांनी आपली पत्रकारिता जोपासली होती.

त्यांच्या निर्भीड व आदर्शवादी पत्रकारितेमुळेच त्यांच्या निवृत्तीनंतर सुद्धा केसरी वृत्तपत्राने त्यांच्यावर उपसंपादक म्हणून जबाबदारी कायम ठेवली होती व आपली जबाबदारी ते अतिशय निष्ठेने पार पाडत होते.
विजय भोसले यांच्या निधनाने राज्याच्या पत्रकारितेतील एक निर्भीड आदर्शवादी पत्रकार गमावला आहे मराठी पत्रकार परिषद पिंपरी चिंचवड पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!