कामशेत शहरात पावसाचा लपंडाव
कामशेत : शहर व परिसरात (दि. १५) दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे वीकेंड निमित्त घराबाहेर पडलेल्या उत्साही पर्यटकांचा हिरमोड झाला.
मागील महिन्यात मावळ तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. शहरातील इंद्रायणी नदीला देखील पूर आल्याची घटना घडली. सलग तीन – चार दिवस पाऊस सुरूच होता. मागील महिन्यात बरसलेल्या जोरदार पावसामुळे कामशेत शहरात सूर्यदर्शन देखील कामशेतकरांना घडले नाही. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पावसाने तुरळक प्रमाणात बरसायला सुरुवात केली. शनिवारी आकाश निरभ्र होते. मात्र रविवारी सकाळी – सकाळी ढग दाटून आले. त्यानंतर शहर परिसरात पावसाला तुरळक प्रमाणात सुरुवात झाली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली असल्याने छत्री, रेनकोट न घेताच बाहेर पडलेल्यांची त्रेधातिरपीट उडाली.
पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडांचा आसरा घेताना कामशेतकर दिसले. तसेच, रस्त्यावरील धूळ व पावसाच्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाल्याने काही ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या.