ताज्या घडामोडी

आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवींवर गंभीर आरोप

पुण्यात साने गुरुजी स्मारकावर बेमुदत उपोषण राजीनाम्याची मागणी

आवाज न्यूज  : साने गुरुजींपासून अनेक समाजधुरीणांची समृद्ध आणि मोठी परंपरा असलेल्या राष्ट्र सेवा दलात  सध्या गोंधळचा वातावरण असल्याचं समोर आलंय. सेवा दलाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघटनेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी आणि कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार पाटील यांनी संघटनेच्या नियमांची पायमल्ली करुन बेकायदेशीरपणे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनेची पदं दिली आणि संघटनेवर कब्जा मिळवला, असा आरोप आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी केलाय. तसेच सेवा दलाच्या अनेक प्रकल्पांचे, मालमत्तांचे हस्तांतरण वा स्थलांतरण सुरू असून अनावश्यक मोठा खर्च केला जात आहे. अनेक गोष्टींमध्ये गैरव्यवहार होत आहे, असा आरोप झालाय. संबंधितांनी आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुणे येथील साने गुरुजी स्मारक येथे 4 कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मिहीर थत्ते म्हणाले, “आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांनी राष्ट्र सेवा दलाची घटना पायदळी तुडवत मागील दीड वर्षांपासून कारभार सुरु केलाय. सेवा दलाच्या घटनेत स्पष्ट तरतुद आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी, पदाधिकारी असेल त्याला राष्ट्र सेवा दलाचं कोणतंही पद घेण्याची परवानगी नाही. मात्र, कपिल पाटील लोकभारती या राजकीय पक्षाचे प्रमुख असताना ते संघटनेच्या कार्यकारी विश्वस्तपदी आहेत. इतकंच नाही तर सेवा दलाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही राजकीय पक्षात जाऊन पद घेण्याची मुभा नाही.”

“राष्ट्र सेवा दल अखिल भारतीय पातळीवर नेता येईल हा विचार करुन डॉ. गणेश देवी यांना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणलं गेलं. ते जागतिक किर्तीचे व्यक्ती आहेत, विचारवंत आहेत. गणेश देवी सर्वांना सोबत घेऊन काम करतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी आल्यानंतर कपिल पाटलांच्या मदतीने मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला. यालाच सेवा दल कार्यकर्त्यांचा विरोध आहे. याबाबत अंतर्गत पातळीवर अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कपिल पाटील आणि गणेस देवी यांनी चर्चेला तयारी दाखवली नाही. त्यामुळे अखेर आम्हाला हा उपोषणाचा संवैधानिक मार्ग निवडावा लागला”, अशी माहिती उपोषणाला बसलेले सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते विलास किरोते यांनी दिली.

दरम्यान, आंदोलकर्त्यांनी कपिल पाटील यांच्यावर पोलिसांचा वापर करुन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. सकाळपासून कपिला पाटील यांनी आपल्या पदाचा वापर करत साने गुरूजी स्मारकात मोठा पोलीस बंदोबस्त लावला. तसेच सुरुवातील स्मारकातही प्रवेश करु देण्यास अडकाव केला. मात्र, नंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर प्रवेश देण्यात आला, असा आरोप उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांनी केलाय. “सेवा दलात ही जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. त्यावर मार्ग काढण्यासाठी संवाद बैठकीची आवश्यकता आहे. अशा विनाअट बैठकीसाठी दोन्ही गटांनी तयार रहावं असं आमचं आवाहन आहे,” अशी भूमिका प्रविण वाणी यांनी मांडली.

आपल्यावरील आरोपांबाबत बोलताना राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी म्हणाले, “आज (4 जून) राष्ट्र सेवा दलाचा 80 वा स्थापना दिन आहे. या दिवशी काही असंतुष्ट लोक एकत्र येऊन अध्यक्ष किंवा पदाधिकारी यांच्यावर विनाधार आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांना 1 मे रोजी संघटनेचं मुखपत्र असलेल्या दल पत्रिकेत उत्तरं छापली आहेत. या जून महिन्याच्याही अंकात ही उत्तरं पुन्हा प्रकाशित केली आहेत. ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांच्यापैकी काहींवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे, तर काहींवर कारवाई करण्याचं काम सुरु आहे. त्यांचं सदस्यत्व रद्द केलंय. त्या रागापोटी ते आंदोलन करत आहेत.”

आंदोलकांनी पत्र लिहून आमच्या राजीनाम्यासाठी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात येणार आहोत असं सांगितलं होतं. तसेच त्यात त्यांनी तेथे कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न झाला तर अध्यक्षांची जबाबदारी असेल असं म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही याबाबत पोलिसांना कल्पना दिली होती

संघटनेचे 40 ते 50 हजार सदस्य आहेत. त्यातील 20-25 जण असंतुष्ट आहेत. संघटनेचं विश्वस्त मंडळ, राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्य कार्यकारणी या तिन्ही फोरममध्ये कोणताही मतभेद नाहीत. हा मुल्यांसाठीच लढा नाही. हे असंतुष्टांचं उपोषण आहे. कपिल पाटील यांना संघटनेचे पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार नाहीत. त्यांना केवळ विश्वस्त मंडळाबाबतचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेवर चुकीच्या लोकांची नियुक्ती केली या म्हणण्यात तथ्य नाही

आमदार कपिल पाटील यांनी मात्र या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. या आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी यावर अधिक बोलणं योग्य नसल्याचं म्हटलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!