तळेगावामध्ये लिंबफाटा येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी आंदोलन
नगरसेवक अरुण माने यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाच्या मार्गाने आंदोलन
तळेगाव दाभाडे : येथील मुंबई-पुणे NH-4 लिंब फाटा या ठिकाणी सतत होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी व उड्डाणपूल करावा या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजता नगरसेवक अरुण माने यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद , दिलीप डोळस, जयवंत कदम, महेश महाजन,खंडू टकले, बाप्पू कदम, किशोर कवडे, नवनाथ कुल, दिलीप चौधरी, सुरेश बोऱ्हाडे,माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, नगरसेविका वैशालीताई दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.तसेच प्रत्यक्ष यमाच्या वेशभूषा परिधान करून हातात गदा घेऊन एक कार्यकर्ता उपस्थित होता.
सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पो.नि. भास्कर जाधव व शहाजी पवार यांनी मध्यस्थी करून MSRDC व आयआरबी कंपनीचे अधिकारी यांना आंदोलन ठिकाणी बोलावून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
यावेळी MSRDC ने लेखी पत्र देऊन आपण केलेल्या मागण्यांचा त्वरित विचार करून आम्ही ताबडतोब कामाला सुरुवात करतो, सध्या उड्डाणपूल करणे हे आमच्या हातात नसून आपण अपघातावर नियंत्रण कसे आणता येईल यासाठी उपाय योजना करूयात असे लेखी आश्वासन सर्वांसमोर दिल्याने हे उपोषणाच्या मार्गाने सुरू असणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. MSRDC ने लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तळेगाव शहरातील जागरूक वाचक कट्टा समूहातील सदस्य तसेच नागरिक, सहाय्यता ट्रस्टचे कार्यकर्ते, तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला. आलेल्या सर्व नागरिकांचे संतोष परदेशी यांनी आभार मानले.