ताज्या घडामोडी

कै. गुरुवर्य वि.गो. तथा अण्णासाहेब विजापूरकर यांच्या ९५ व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

तळेगाव : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक चिटणीस कै. गुरुवर्य वि.गो. तथा अण्णासाहेब विजापूरकर यांच्या ९५व्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून उद्बोधन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

अण्णासाहेब विजापूरकर फुलपाखरू उद्यानामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व अण्णासाहेब विजापूरकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलताना ते म्हणाले, शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक असून, शिक्षण हे फक्त पुस्तकी नसावे जर त्याला व्यवसायाची जोड दिली तर मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व खुलते. ११५ वर्षापूर्वी राष्ट्रीय शिक्षणाची मशाल हाती घेऊन गुरुवर्य अण्णासाहेबांनी लोकमान्य टिळकांच्या साथीने संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

याप्रसंगी गरवारे ब्लड बँकेचे विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पोवार, उपशिक्षणाधिकारी अंकुश शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार राजेश मस्के, सुरेशभाई शहा, संस्थेचे संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शहा, सोनबा गोपाळे, गणपत काळोखे, विनायक अभ्यंकर, मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, इंजिनीअरिंग कॉलेजचा संपूर्ण स्टाफ, संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

उपशिक्षण अधिकारी अंकुश शिंदे म्हणाले की, अनेक राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी राष्ट्रीय शिक्षणाचा वसा आणि वारसा आजही जपताना दिसते. सामाजिक बांधिलकी ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय भेगडे म्हणाले की, ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्प आहे. वर्तमान व भविष्याची गरज ओळखून विविध उपक्रम शाळांमध्ये राबविले जातात. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी जास्त वेळ देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे आव्हान भेगडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पोटे व प्रभा काळे यांनी केले, तर आभार संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!