मावळात अंगणवाडीसेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन
वडगाव : अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कमी दर्जाचे असून त्याचा वापर करणे सेविकांना त्रासदायक झाले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दिनांक 25 )रोजी वडगाव मावळ येथे मोबाईल वापसी आंदोलन केले.
पंचायत समिती महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाच्या समोर सीआयटू संघटनेच्या प्रदेश सचिव शुभा शमीम, जिल्हाध्यक्षा रजनी पिसाळ, तालुकाध्यक्षा अनिता कुटे, सचिव अर्चना ढोरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन पार पडले.आंदोलनास मावळ तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल कमी दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात सतत बिघाड होतो. नवीन ॲप त्यात घेता येत नाही. त्यातील पोषण ट्रॅकर ॲप नीट चालत नाही. त्यामुळे आम्ही त्रस्त झाल्या आहोत अशा तक्रारी अंगणवाडी सेविकांनी यावेळी केल्या.