बंडा जोशी यांच्या ‘हास्यपंचमी’ या एकपात्री प्रयोगात रंगले ज्येष्ठ नागरिक
तळेगाव : येथे काल मंगळवार (30 नोव्हेंबर) रोजी सेवा धाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय आणि इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, वतननगर यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य कलाकार बंडा जोशी यांच्या हास्यपंचमी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाना भालेराव कॉलनीतील सेवाधाम वाचनालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, सेवाधाम वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, त्याचबरोबर ॲड. सहदेव मखामले, इच्छापूर्ती सेवा नागरिक संघाचे अध्यक्ष काळोखे गुरुजी व ढमाले गुरूजी व्यासपीठावर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या मनोगतानंतर बंडा जोशी यांच्या हास्यपंचमी या एकपात्री प्रयोगाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लॉकडाऊन नंतर प्रथमच प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचा आनंद लुटत ज्येष्ठ नागरिकांनी मनमुराद दाद दिली.
बंडा जोशी यांनी त्यांच्या शैलीत नेक किस्से सांगत प्रचलित गाण्यांच्या तालावर विडंबन काव्येही सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता मोहिते यांनी केले. तर गावडे यांनी आभार मानले.