ताज्या घडामोडी

बांधकाम व्यावसायिक महिलेची 72 लाखांची फसवणूक

तळेगाव: व्यावसायिक महिला आणि तिच्या पतीने व्यवसायासाठी सुरक्षा ठेव म्हणून दिलेली 40 लाख रुपये रक्कम दोन भागीदारांनी संबंधित व्यावसायिक महिला आणि तिच्या पतीला अनभिज्ञ ठेऊन जमिनीच्या खरेदी व्यवहारासाठी वापरली. व्यावसायिक महिला आणि त्यांच्या पतीने कंपनीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या हिश्श्याचे 32.5 लाख रुपये कंपनीतील अन्य भागीदारांनी त्यांना न देता त्यांची 72.5 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघा भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वडगाव मावळ येथे 12 ऑक्टोबर 2015 रोजी घडला असून याप्रकरणी 11 डिसेंबर 2021 रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रसिका रोहन भालेराव (वय 42, रा. बाणेर रोड, बाणेर पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार मिलींद भागवत पोखरकर (रा. डी पी रोड, पिंपळे निलख), अतुल भागवत पोखरकर (रा. पनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 19 मे 2015 रोजी मार्क बिल्डकॉन या भागीदारी संस्थेसाठी मिलींद पोखरकर व फिर्यादी यांचे पती रोहन भालेराव यांनी रजनीष भास्कर ढोरे यांच्या सोबत पुरवणी करारनामा केला होता. या करारनाम्यानुसार मिलींद पोखरकर व रोहन भालेराव यांनी 80 लाख रुपये एवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमीनीचे मालक रजनीष भास्कर ढोरे यांना दिलेली आहे. या रक्कमेपैकी फिर्यादी आणि त्यांच्या पतीने त्यांच्या हिश्श्याची 40 लाख रुपये रक्कम दिली. सुरक्षा ठेव म्हणून दिलेली रक्कम ही बेलिना प्रकल्प पूर्ण झालेनंतर व प्रकल्पाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर परत देण्याच्या बोलीवर दिलेली होती.

10 सप्टेंबर 2015 रोजी फिर्यादी, त्यांचे पती रोहन भालेराव, मोनिका पोखरकर व अतुल पोखरकर यांनी मार्क बिल्डकॉन या भागीदारी संस्थेतून निवृत्ती घेण्याचे ठरवले. तसा पुनर्रचना करारनामा केला. या करारनाम्यानुसार मिलींद पोखरकर, विनायक गारवे, किशोर गारवे यांनी मार्क बिल्डकॉन ही भागीदारी संस्था पुढे चालू ठेवण्याचे ठरवले होते. या निवृत्ती नंतर फिर्यादी व त्यांच्या पतीच्या हिश्श्याचे 32 लाख 50 हजार एवढी रक्कम मार्क बिल्डकॉन या संस्थेकडून त्यांना देणे आहे. तसेच निवृत्तीचे वेळी सर्व भागीदारांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या पतींनी सुरक्षा ठेव म्हणून दिलेले 40 लाख रूपये त्यांना देणे करारनाम्याप्रमाणे ठरलेले होते. सुरक्षा ठेव म्हणून दिलेली रक्कम 40 लाख व व्यवसायातील त्यांच्या हिश्श्याचे 32.5 लाख असे एकूण 72 लाख 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन मिलींद पोखरकर व अतुल पोखरकर यांनी दिले. त्यामुळे फिर्यादी यांनी भागीदारी संस्थेतून निवृत्ती घेतली.

मिलींद पोखरकर व अतुल पोखरकर यांच्याकडे फिर्यादी यांनी त्यांच्या रकमेची वेळोवेळी मागणी केली असता त्यांना काहीतरी बहाण्याने रक्कम देणे त्यांनी टाळले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीस वडगाव मावळ येथील बेलिना प्रकल्पाचा पूर्णत्वाचा दाखला मिळाला असल्याचे, तसेच 26 जुलै 2021 रोजी भोगवाटा प्रमाणपत्र मिळालेले असल्याचे समजले. ही बाब मिलींद पोखरकर यांनी जाणीवपूर्वक फिर्यादी पासून लपवून ठेवली. पोखरकर यांनी विकसनासाठी घेतलेल्या जमिनीचे फिर्यादी यांच्या परस्पर खरेदीखत केले. यामध्ये पोखरकर यांनी फिर्यादी यांची एकूण 72 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!