ताज्या घडामोडी

तळे उत्खनन प्रकरण; नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना नगर विकास खात्याची कारणे दाखवा नोटीस

तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्षांन सह आठ नगरसेवकांना तळे उत्खनन प्रकरणात राज्य सरकारने दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तळेगाव स्टेशन भागातील तळ्यामधील गाळ, माती, मुरूम लोकसहभागातून काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याच्या तक्रारीत अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. नगराध्यक्षांवर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी तर स्थायी समितीचे तत्कालीन सात नगरसेवकांना ही पुढील पाच वर्षासाठी नगरसेवक होण्यास अपात्र का ठरवू नये अशी नोटीस दिली आहे. याबाबतचे लेखी खुलासा 15 दिवसांच्या आत न दिल्यास पुढील कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.

भाजपच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, भाजपचे नगरसेवक अरुण भेगडे, विभावरी दाभाडे,अमोल शेटे, संध्या भेगडे, शोभा भेगडे, संग्राम काकडे तसेच तत्कालिन नगरसेवक संदीप शेळके यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

तळ्यातील गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी तहसिलदारांनी दंडाचे आदेश पारित केले होते. उत्खनन केलेल्या मालाची रॉयल्टी व दंड असे जवळपास 80 कोटी रुपये शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. याला आपण जबाबदार आहात आपणाकडून वित्तीय अधिकाराचा गैरवापर व अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. झालेल्या कामाची खात्री न करता देयक अदा झाले आहेत.असे करताना  पदाचा गैरवापर झाल्याचे दिसून येते.अनियमिततेस आपण जबाबदार आहात असे नोटिशीत म्हटले आहे.

कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशीच नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना बजावलेल्या नोटीशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!