ताज्या घडामोडी

किमान मासिक पेन्शनमध्ये नऊ पट वाढ होणार?

आवाज न्यूज : कर्मचाऱ्यांच्या मासिक किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या मागणीला सरकारकडून अनुकूल प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन वर्षात सरकार याविषयीचे धोरण ठरवून कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देऊ शकते. सरकार किमान निवृत्तीवेतन वाढवण्याचा दिशेने प्रयत्न करत असून सध्या किमान मासिक वेतन अवघे हजार रुपये मिळत आहे, हे निवृत्ती वेतन 9 हजार रुपये मासिक करण्याची योजना सरकार करत आहे. सरत्या वर्षाच्या सप्टेंबर मध्ये सुद्धा याप्रकरणी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला होता. मात्र अर्थ मंत्रालयाकडून हिरवी झेंडी न मिळाल्याने हा प्रस्ताव बाजूला सारण्यात आला होता.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कामगार मंत्रालयाकडे कर्मचारी संघटनांनी मासिक किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र या निवेदनावर अर्थ मंत्रालयाने प्रतिकूल प्रतिसाद दिला होता. दरम्यान निवृत्ती वेतन हा मूलभूत अधिकार असल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मध्यंतरी काहीच हालचाल न झालेल्या प्रकरणात आता सरकारने लक्ष घातले असून फेब्रुवारी महिन्यात याविषयीचा निर्णय घेण्यासाठी कामगार मंत्रालयाची एक महत्वपूर्ण बैठक होऊ शकते. संसदेच्या स्थायी समितीने केलेल्या शिफारसी विषयी श्रम मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. नवीन वेतन कोड विषय सुद्धा या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मार्च 2021 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान निवृत्तिवेतन 1 हजार रुपये वरुन 3 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी केली होती. परंतु निवृत्तीवेतनधारकांनी किमान निवृत्तिवेतन हे 1 हजार रुपये वरून 9 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. पाच राज्यातील उच्च न्यायालयांनी निवृत्ती वेतनाला मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिलेली आहे.

ईपीएफओ अंतर्गत भविष्य निधी रक्कम मिळवण्यासाठी सर्व ग्राहकांना कर्मचारी पेंशन योजना 1995 लागू आहे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. या सदस्यांना 58 व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळते. यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 10 वर्षे नोकरी करणे अनिवार्य आहे. योजनेअंतर्गत नियुक्ती कर्मचाऱ्यांच्या नावे ईपीएफ मध्ये 12 टक्के रक्कम जमा करतात. ज्यामध्ये निवृत्तीवेतनासाठी 8.3 टक्के रक्कम दिली जाते आणि निवृत्तीनंतर पेन्शन ची रक्कम पेन्शन फंडातील योगदानाच्या आधारावर ठरवली जाते. या योजनेअंतर्गत किमान 1 हजार रुपये पेन्शन दिल्या जात आहे. या योजनेत विधवा पत्नीचे निवृत्ती वेतन मुलांचे निवृत्ती वेतन अशा सुविधा उपलब्ध आहेत. जर कर्मचाऱ्याचा 58 व्या वर्षापूर्वीच मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलांना निवृत्तीवेतन मिळते.

काही उच्च न्यायालयाने निवृत्ती वेतन हे मूलभूत अधिकार असल्याचे मान्य केले आहे.तर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतनाची रक्कम थांबविता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र निवृत्ती वेतन हा मूलभूत अधिकार असल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जर कमाल मर्यादा काढून टाकली तर त्याचा लाभ पेन्शनधारकांना मिळेल. निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाप्रमाणे निवृत्ती वेतन निश्चित करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाने यापूर्वीच केलेली आहे. कामगार मंत्रालयाकडे त्यांनी या विषयीचे निवेदन दिलेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!