ताज्या घडामोडी

गानसम्राज्ञी लतादीदी यांना शनिवारी संगीत पूजक अर्पण करणार ‘गीत सुमनांजली’!

जनसेवा विकास प्रतिष्ठान व भगत बिल्डर्स यांच्या वतीने श्रद्धांजली मैफलीचे आयोजन

आवाज न्यूज : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना येत्या शनिवारी (12 फेब्रुवारी) शनिवारी संगीत पूजक व रसिकांच्या वतीने गीत सुमनांजली अर्पण करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास प्रतिष्ठान व भगत बिल्डर्सच्या वतीने ‘मेरी आवाज ही पहचान है’ या संगीत श्रद्धांजली मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. नादब्रह्म संगीतालयाचे कलाकार लतादीदींना त्यांनी गायलेल्या गीतांची उजळणी करीत आदरांजली वाहणार आहेत.

तळेगाव दाभाडे येथे यशवंतनगरमध्ये गोळवलकर गुरुजी मैदान (गोल ग्राऊंड) येथे शनिवारी संध्याकाळी सहा वाजता कोविड निर्बंधांचे पालन करीत हा कार्यक्रम होणार आहे. एमपीसी न्यूज आणि आवाज न्यूज चॅनेलच्या फेसबुक पेज वर या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण अर्थात फेसबुक लाईव्ह देखील करण्यात येणार आहे. जनसेवा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर आवारे आणि भगत बिल्डर्सचे संचालक नगरसेवक निखील भगत यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक प्रार्थना, आनंदघन या नावाने संगीतबद्ध केलेल्या गीतरचना, छत्रपती शिवाजी महाराजांवरील वीररसातील गाणी, अभंग, गाजलेली हिंदी गाणी तसेच देशभक्तीपर गीतांची झलक सादर केली जाणार असून आम्ही कलाकार या माध्यमांतून लतादीदींच्या चिरंतन स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे नादब्रह्म संगीतालयाचे संचालक विनायक लिमये यांनी सांगितले.

नामवंत गायक व संगीतकार विनायक लिमये, संपदा थिटे, लीना परगी, डॉ. सावनी परगी, विराज सवाई, स्वप्नील झळकी, अंकुर शु्क्‍ल, कीर्ती घाणेकर हे गायक कलाकार या कार्यक्रमात लतादीदींची गाणी सादर करणार असून त्यांना मंगेश राजहंस, प्रवीण ढवळे, दीप्ती कुलकर्णी, ओंकार पाटणकर हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. प्रसिद्ध निवेदिका डॉ. विनया केसकर या त्यांच्या निवेदनातून लतादीदींच्या आठवणींना उजाळा देतील.

संगीत रसिकांना या कार्यक्रमास प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन उपस्थिती लावून आपल्या लाडक्या लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन किशोर आवारे व निखिल भगत यांनी केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!