लोणावळ्यातील भुशी डॅम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रेल्वेने सहकार्य करावे – खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी
लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोणावळ्यातील भुशी डॅम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रेल्वेने सहकार्य करावे अशी मागणी लोकसभेत केली आहे. त्यासाठीची ना हरकत (एन ओ सी) रेल्वे विभागाने तात्काळ द्यावी असे बारणे म्हणाले.
लोकसभेत बोलताना ते म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघातील लोणावळा येथे रेल्वे विभागाचा भुशी डॅम 1860 साली पाण्याच्या स्त्रोतासाठी बांधण्यात आला. पावसाळ्यात लाखो पर्यटक भुशी डॅम पाहण्यासाठी येतात. भुशी डॅम हे मुंबई-पुण्याच्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
2014 साली भारतीय रेल्वेने भुशी धरण खाजगी क्षेत्राच्या सहभागाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी योजना जाहीर केली होती. परंतु त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी या पर्यटनस्थळावर पर्यटकांना सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वेने एनओसी द्यावी. रेल्वे विभागाकडून एनऒसी मिळाल्यास महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून भुशी डॅम विकसित करण्यात येईल. यासाठी रेल्वे विभागाने सहकार्य करावे अशी मागणी खासदार बारणे यांनी लोकसभेत केली.