ताज्या घडामोडी

आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा नक्की विकास होईल – जयंत पाटील

तळेगाव : आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्याचा विकास होईल.शेळके जनतेसाठी झटणारा नेता आहे असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी संवाद यात्रेच्या निमित्ताने काढले.राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक एक कार्यकर्ता जोडला जात असून आज आपला पक्ष तळागाळात उभा होत आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या पक्षात आता सुनील शेळके, रोहित पवार, निलेश लंके असे तरुण लोक जबाबदारीने नेतृत्व करत आहेत. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनील अण्णा जवळपास १ लाख मतांच्या लीडने निवडून आले आहेत असे बोलून जयंत पाटील यांनी सर्व मावळवासियांचे आभार मानले. तसेच आमदार सुनील शेळके यांनी आजवर आपल्या मतदारसंघासाठी ९०० कोटींचा निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. अण्णा हा माणसासाठी झटणारा नेता आहे. संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू झाला आहे. सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

मावळाच्या भूमीने आपल्याला शिवरायांचे शौर्य सांगितले आहे. दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे, ती यापुढेही कायम राहील असा दावा ना. जयंत पाटील यांनी केला. पुढे केंद्रीय जुलमीशाहीचा पाढा वाचताना ते म्हणाले की, आपले सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे, त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहे. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं, नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं, मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता त्यांना अटक करण्यात आली. जाणीवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकले, अशी टीका ना. जयंत पाटील यांनी केंद्रीय सत्ताधाऱ्यांवर केली. मात्र महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेवर आले आहे. त्यामुळे कोणीही कितीही अडथळे आणले तरी देखील महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणार, अशी खात्री जयंत पाटील यांनी सर्व उपस्थितांना दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीला आमदार सुनील अण्णा शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, महिला सरचिटणीस संगिता साळुंके, तालुकाध्यक्ष बबन भेगडे, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!