प्रत्येकाने मराठी भाषेतील आत्मकथन, आत्मचरित्र वाचावे, जीवनात परिवर्तन घडेल – व्याख्यात्या डॉ. निशा भंडारे
चिंचवड : कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर, प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थी मराठी भाषेतील कवी संमेलन प्रबोधन नाटीका, काव्य, गीत वाचनाचे सादरीकरण व्याख्यान कार्यक्रम राबविण्यात आले.
संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, डॉ. वनिता कुर्हाडे यांच्याहस्ते कवि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्याख्यात्या डॉ. निशा भंडारे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. रविंद्र निरगुडे, प्रा. अमिता देशपांडे आदी उपस्थित होते.
व्याख्यात्या डॉ. निशा भंडारे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, आपण आज विद्यार्थी असला तरी भावी काळात जबाबदार शिक्षिका होणार आहात. विद्यार्थ्यांना खरा इतिहास शिकवा आपण कुठल्याही जाती, पंथाच्या असू मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामुळे आज महिला सक्षम होत आहेत. इंग्रजी भाषेचा प्रसार होत असला तरी, मातृभाषेतूनच प्रेम व्यक्त करता येते. इंग्रजी भाषेचा बाऊ न करता मराठी मातृभाषेतून येणार्या पिढीने शिक्षण घेतले तर बिघडते कुठे? आपण कधी बदलणार आहोत? आज याचे प्रत्येकाने विचार, चिंतन, मनन करा, सर्व सामान्यांना गीतेचा सार कळाला पाहिजे. मराठी भाषेवर प्रभुत्व असेल तरच यशस्वी होता येईल. मराठी भाषा स्पष्ट बोलायला शिका, मराठीतील आत्मकथन, आत्मचरित्र वाचून स्वतःबरोबर इतर विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवा, असे आवाहन यावेळी करून आज कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीपासून ‘मराठीतूनच बोला इंग्रजीचा वापर टाळा’, असा संकल्प प्रत्येकाने करून प्रत्यक्षरूपी आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. गीता कांबळे यांनी केली. यावेळी प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यार्थीनी स्वाती बोचरे, तेजस्वी कडू यांनी तर, आभार अश्विनी कदम यांनी मानले.