अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक
पुणे : येथील कौन्सिल हॉलच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या कोविड-१९ निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याबाबत निर्देश दिले.
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्या वर गेल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.
पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही याची खबरदारी प्रत्येकोने घेतली पाहीजे. ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल. पुणे जिल्ह्यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना सर्वांची मते विचारात घेत निर्णय घेण्यात येतात. आपल्या सर्वांची मते विचारात घेत निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हॉटेल आणि रेस्टॉरंटला ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त ४ वाजेपर्यंत खुले राहतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.