आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

साहित्य विश्वातील महामेरु हरपला!

ज्येष्ठ लेखक महादेव मोरे (मामा ) यांचे निधन, सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून निघणार अंत्ययात्रा!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21) आनंद संकपाळ 

निपाणीचे नाव मराठी साहित्यात अजरामर करणारे ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.

मराठी साहित्यात विपुल लेखन सतरा कादंबऱ्या, सतरा कथासंग्रह, चार ललित लेखसंग्रह नावावर असलेले हे लेखक पस्तीस वर्षे पिठाच्या गिरणीत काम करत होते. आणि साहित्य लेखन माध्यमातून लोकांच्या अनेक विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. व आयुष्ययभ  दुःखांचे दळण दळले.

निपाणीचे ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांनी पिठाच्या गिरणीत काम कले. सुरुवातीला निपाणी येथील जुना मोटर स्टॅन्डवर असलेल्या मोरे मामा यांच्या पिठाच्या गिरणीत मी त्यांना पाहत होतो. कॉलेजला असताना मोरे मामा त्यांच्या गिरणीसमोर असलेल्या कृष्णाच्या सायकल दुकानात बसत असत.आम्ही तेथे सायकल दुरुस्तीला नेहमी जायचो. निपाणीच्या सर्व घडामोडींची अफाट माहिती असलेले महादेव मोरे यांचा एकसष्ठीचा कार्यक्रम विद्यामंदिर हॉलमध्ये आम्ही केला होता आणि त्या कार्यक्रमा पासून महादेव मामा यांच्याशी एक आपुलकीचं व स्नेहाचं नातं निर्माण झालं होतं.

सुरुवातीला निपाणीतील कामगार चौक येथे ते राहत होते.आता महादेव मोरेंचं घर निपाणी माने प्लॉट परिसरात आहे. त्यांची पिठाची गिरण तिथे आली .गिरण बरीच वर्षे सुरू होती. अलीकडे तब्येतीच्या कारणाने गिरण बंद आहे. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पायजमा पायात साधं स्लीपर घातलेले महादेव मोरे म्हणजे मराठी भाषेचा खजिना होते. हेच महादेव मोरे! मराठी साहित्यात भरीव योगदान दिलेले लेखक, कानडी मुलखात राहूनही मराठीतून लिहिणारे. त्यांच्याकडे पाहिल्यावर ते लेखक असतील, असं वाटणार नाही, इतके साधे. बोलण्यात कोल्हापुरी सूर. त्यांना अनेकदा भेटत होतो, तुम्हाला भेटायला आलोय असं सांगून मनमोकळ्या गप्पा होत होत्या.

महादेव मोरेंचे वडील टॅक्सीचालक होते. घरची परिस्थिती बेताचीच. त्यांना नऊ भाऊ, तीन बहिणी. हे सगळ्यात थोरले. प्राथमिक शाळेत महादेव यांना असताना वाचनाचा छंद लागला. तेव्हा ते गुरुजींकडून मिळणाऱ्या साहसी कथा, रहस्यकथांची पुस्तके वाचायचे. दिवसेंदिवस त्यांचं वाचनाचं वेड वाढतच गेलं. हायस्कूलच्या काळात त्यांनी सानेगुरुजी, वि. स. खांडेकर यांची पुस्तके वाचली. निपाणीला हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या गोखले कॉलेजात आले. या काळातही त्यांनी मनसोक्त वाचन केलं.वाचताना त्यांच्या मनावर नवकथाकार अरविंद गोखले यांच्या कथांचा प्रभाव पडला. यात्रेवर त्यांनी ‘म्हाईचा दिवस’ ही कथा लिहिली. ती कथा एका स्पर्धेसाठी पाठवली. आणि त्या कथेला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. पहिल्याच कथेला बक्षीस मिळाले, ही घटना मोरे काकांना यांना भारी वाटली. त्यांच्यासाठी तो एक सुखद धक्का होता. बक्षीस मिळाल्यानंतर मात्र त्यांनी सगळे लक्ष लेखनाकडे वळवले. याच काळात त्यांना कोल्हापूरहून शिक्षण सोडून निपाणीला यावे लागले. कारण ते इंटरआर्टच्या इंग्रजी विषयात नापास झाले. फक्त परीक्षेसाठी कोल्हापुरात थांबण्यासारखी त्यांची आर्थिक स्थिती नव्हती. त्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलं. त्यामुळे निपाणीतच थांबून काहीतरी पोटापाण्याचा व्यवसाय करावा, असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांनी मित्रांच्या समवेत निपाणीत चार चाकी गाड्यांचं गॅरेज सुरू केलं. या गॅरेजमध्ये त्यांना नाना तऱ्हेची माणसं भेटायची. दिवसभर गॅरेजमध्ये काम करताना ऐकलेले वेगवेगळे अनुभव त्यांच्या मनाला भिडलेले असायचे. रात्रभर जागून तेच अनुभव लिहू लागले. त्यातूनच काही कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. या लेखकाच्या कथा पुण्या-मुंबईच्या दर्जेदार साहित्य मासिकांतून छापून यायला लागल्या. दूरवरून वाचकांची पत्रे यायला लागली. लेखकांच्या वर्तुळातही या लेखकाची चर्चा व्हायला लागली. काही लेखक पत्रे पाठवून कौतुक करू लागले. पण मोरें यांना याचं अप्रूप वाटत नव्हतं. ते नित्यनियमाने गॅरेजला जायचे. रिकाम्या वेळेत लिखाण करायचे.

ते सांगत, ‘तेव्हा एका कथेला दहा रुपये मानधन मिळायचे. हे पैसेही खूप वाटायचे, कारण दहा रुपयात आठवड्याचा बाजार व्हायचा. कथा छापून आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हे मानधन यायचे.’

पंधरा वर्षे गॅरेजमध्ये काम केल्यावर मोरे यांनी टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ते सर्वत्र फिरू लागले. या काळातील अनुभवाबाबत मोरे मामा सांगत, ‘तेव्हा रोज नवी माणसं भेटायची. प्रवास करताना माणसं त्यांचे अनुभव सांगायची, त्यातले अनेक अनुभव ऐकून घालमेल व्हायची. मग ऐकलेलं कागदावर लिहून काढायचो. त्यातूनच जीवनाची शोकांतिका मांडणारी ‘एकोणिसावी जात’ कादंबरी मी लिहून काढली असे ते नेहमी आवर्जून सांगत.

एक-दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हरचे काम केल्यानंतर त्यांच्या भावाची पिठाची गिरणी चालवू लागले.पस्तीस वर्षे पिठाच्या गिरणीत काम केले. या पिठाच्या गिरणीत दळण घेऊन येणाऱ्या बायका कष्टकरी कुटुंबातील होत्या. काही बायका देवदासी, विधवा, परित्यक्ता होत्या. त्या गिरणीवाल्या मामाला विश्वासानं मनातल्या गोष्टी सांगायच्या. या बायकांना महादेव मामा आधार असायचे. व्यसनी, दारूड्या नवऱ्याच्या बायका मामाकडं नवऱ्याची तक्रार घेऊन यायच्या. त्यांची दुःख या गिरणीवाल्या मामाला सांगायची. मग शोध सुरू व्हायचा. या शोधातूनच लिखाण सुरू झाले. कधी वेळ मिळेल तेव्हा रात्री अपरात्री लिहीत बसलेला हा लेखक कोंबडा आरवल्यावरच भानावर यायचा. गिरणीतील काम संपल्यावर तिथंच बाकड्यावर बसून लिहायला बसायचा. गिरणीतल्या याच बाकड्यावर पेपर साठी अनेक कथा लिहिल्या. यांनी ‘चेहऱ्यामागचे चेहरे’, ‘चिताक’ हे राज्य सरकारने पुरस्कार दिलेले कथासंग्रह लिहिले आहेत. संपूर्ण देशभरात, आशिया खंडात चर्चा झालेल्या निपाणीच्या तंबाखू आंदोलनावरची ‘झोंबडं’ ही कादंबरी गिरणीच्या बाकड्यावर बसून लिहिली आहे. पिठाची गिरणी महादेव मोरे यांची ‘लेखनाची प्रेरणा’ बनली होती.

‘फकस्त लिखाण करून प्रपंच चालवणं शक्य नाही. लोकांना वाटतंय, लेखकाला लिहून लई पैसे मिळत असतील; पण काही खरं नाही. संसार घरासाठी कष्ट करावे लागतातच की …’ निपाणी बेळगाव नाका, येथील माने प्लॉट मध्ये गिरणीच्या पाठीमागे मोरेंचं घर आहे. घरात शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराच्या फ्रेम लावलेल्या. त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारत असे. अनेक वेळा ते फिरत फिरत निपाणी बेळगाव नाका येथील आमच्या ऑफिसमध्ये यायचे मेडिकल ला आलो होतो. दुकान ला आलो होतो. असे म्हणून सांगायचे रस्त्यावर सहज येता येईल असे आमचे ऑफिस असल्यामुळे महादेव मोरे मामा यांच्याशी अनेकदा संवाद व्हायचा. कितीतरी गोष्टी कितीतरी आठवणी आम्हाला माहीत नसलेल्या मामा भरभरून सांगायचे माझ्या पत्नीला ,मुलीला खूप काही सांगायचे. अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ आणि भरल्या हृदयाचा माणूस आमच्या हृदयात नेहमी जवळ असणारे महादेव मामा यांचा आमच्या ऑफिसमध्ये परवा 22 जून रोजी त्यांचा 85 वा वाढदिवस आम्ही साजरा केला.या प्रसंगी देवचंद कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रमेश साळुंखे  प्रा. नानासाहेब जामदार यांच्यासोबत खूप वेळ चर्चा झाली ही भेट शेवटची ठरली.


   ‘हात चालत्यात आणि डोळ्याला दिसतय तोवर लिहायचं…

कसलीही अपेक्षा करायची नाही बघा.’ आम्ही बोलत बसलेलो. विपुल लिहूनही जमिनीवर पाय असणारा लेखक, लिहिणं आणि जगणं यात तफावत नव्हती अतिशय साधी राहणी महादेव मोरे नावाचा एक भला मोठा माणूस आणि त्याचं जगणं मला अनेक वर्षे जवळून बघायला मिळालं होतं. आपुलकीचा सहवास आणि आश्वासक हात माझ्या खांद्यावर होता. आता महादेव मोरे मामा यांच्या आठवणींचा सहवास आपल्या सोबतीला असेल.


आदरणीय महादेव मोरे मामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! यांची अंत्ययात्रा सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरातून माने  प्लॉट येथून निघणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!