आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

पीठानं माखलेल्या पण विद्यापीठात पोहोचलेल्या कै. महादेव मोरे यांना निपाणीकरांची शब्दांजली!

निपाणी वाल्मिकी भवन येथे विनयांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (27)

पीठात माखलेले पण विद्यापीठात पोहोचलेले ज्येष्ठ साहित्यिक लेखक कथाकार कै. महादेव मोरे (मामा) यांना निपाणीकरांनी वाहिली शब्दांजली!  21 ऑगस्ट रोजी यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले होते.त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली होती. सर्व स्तरातून व सर्व विभागातून मोरे मामांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम झाले होते. पण काल निपाणीच्या सुपुत्राचा त्याच्या कर्मभूमीमध्ये झालेल्या शब्दांजलीच्या कार्यक्रमास एक भावनिक  किनार होती. कारण ते या निपाणीच्या भूमीत घडले, वाढले, व निवर्तले सुद्धा त्यामुळे त्यांची निपाणीकरांशी एक वेगळीच नाळ जोडली होती.

प्रारंभी सर्व शोकाकुल मान्यवरांच्या हस्ते मामांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे त्यांचे भाऊ प्राध्यापक शिवाजी मोरे म्हणाले आजचा दिवस माझ्या व माझ्या कुटुंबीयांसाठी अतिशय भावनिक असून माझ्या भावा बरोबरचे अनेक दिवस मी अतिशय कष्टाने व योग्य मार्गाने कंठीत केले असून त्यांचा सहवास मला नेहमीच हवाहवासा वाटायचा. आमच्या घरी जनावरे असायची त्यामध्ये सोनी नावाची एक म्हैस होती. त्यांनी त्या म्हैशीवर लिहिलेला लेख आज देखील मला जशाचा तसा आठवतो.

प्राध्यापक नानासाहेब जामदार यांनी मामांचा जीवनपट असा काही उलगडून दाखवला की त्यातील अनेक कांगोरे, मिश्कील कोट्या, मामा कशा करत असत हे सोप्या भाषेत उलगडून सांगितले. एका कार्यक्रमाला गेल्यानंतर मामांना राधानगरीच्या एका मंडळांने भाषणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मेजवानी म्हणून तेराव्याचे जेवण देखील खाऊ घातल्याची आठवण सांगितली.

एन डी  जत्राटकर म्हणाले की राग न धरता भावनिक साद घालून सामाजिक हित जपणारा माणूस हरपला आहे. देवचंद महाविद्यालयाचे संचालक प्रशांत गुंडे यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणीतील मामा व त्यांच्या भावांचे अनेक प्रसंग कार्यक्रमात सांगितले. कबीर वराळे म्हणाले की या माणसाची संगत आणि पंगत आपल्याला लाभावी म्हणून मी खडकेवाडा वरून दळपाचे निमित्त करून मामांचा सहवास मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. आनंद संकपाळ म्हणाले  योगायोगाने मी कवी कुसुमाग्रजांना भेटलो होतो त्याप्रसंगी मी निपाणीचा आहे म्हटल्यानंतर पहिला प्रश्न कुसुमाग्रजांनी केला की लेखक महादेव मोरे कसे आहेत. हे विचारल्यानंतर मी मामांच्या संपर्कात असल्याचे समाधान  लाभले त्यांच्या एक्सष्टीच्या कार्यक्रमात ते भरभरून बोलले असल्याची आठवण सांगितली. श्रद्धांजली कार्यक्रमात माजी प्रशासकीय अधिकारी  एस. एम पोळ, विठ्ठल वाघमोडे, दीपक इंगवले, सुप्रिया पाटील, एन आय खोत, यांनी देखील मामांच्या आठवणी सांगितल्या. तसेच कार्यक्रमास प्रत्यक्ष येऊ न शकलेले पण मोरे मामा प्रति अतिव प्रेम असलेले अजित सगरे, लेखी संदेशात म्हणतात, ज्यांच्या नावातच महादेव आहे त्या महादेवाने पाच दशके आपल्या लेखणीने वाणीने आणि कार्याने समाजमनावर आणि व्यक्ती मनावर आपली स्वतंत्र अक्षर मुद्रा उमटवली आहे ज्यांनी आयुष्यभर खडतर प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत करत उपेक्षितांचे अंतरंग दाखवत असताना ज्ञानसाधना आणि श्रमसाधना यांचा समन्वय साधून अस्तित्वासाठी जगण्याचा संघर्ष करत असणाऱ्या समाजाच्या उपेक्षित घटकांना आपल्या लिखाणाचा केंद्रबिंदू म्हणून त्या प्रवाहाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला अशा साहित्यिक महादेव मोरेना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, त्याचबरोबर उमेश शिरगुप्पे, ज्येष्ठ लेखक दि. बा. पाटील आनंदहरी इस्लामपूर यांनी समाज माध्यमांच्या स्वरूपात आपले लिखित शोक संदेश पाठवले होते त्याचे देखील वाचन कार्यक्रमात करण्यात आले.

कवी किरण मिस्त्री यांनी मामाच्या प्रति आपले प्रेम व्यक्त करताना खालील कविता वाचन केली..

नको असावं श्रद्धांजली. ,वहा शब्दांचीच फुले.

आयुष्य अक्षर ओळ माझे, जणू पुस्तकचं खुले.

नको जनमाची आस, पुरे झाला हाच ध्यास..

शब्द उरलेत मागे, माझा घेऊनिया श्वास….. 🙏🙏💐💐

खरंच,  महादेव मोरे मामांची पिठाची गिरणी पुन्हा सुरू होईल कदाचित, पण इथल्या सर्वसामान्य लोकांचं जगणं, त्यांच्या व्यथा आणि वेदनांच दळण स्वतःच्या कथा आणि कादंबरीतून जिवंत करणारा लेखक पुन्हा होणार नाही हीच खरी खंत मनाला सलत राहील. पण त्यांचं सर्व लेखन आज देखील उपलब्ध असून त्याचा ठेवा आजन्म आमच्यासाठी प्रेरणास्रोत होण्यासाठी म.मो. पुस्तकालय उभारणे गरजेचे असल्याचे एक पत्रकार म्हणून मला वाटत आहे. आयुष्भर पिठाच्या गिरणीत काम करणारे मोरे मामा, पिठा सारखं पांढरशुभ्र किंबहुना पीठानं माखलेल्या पण विद्यापीठात पोहोचलेल्या त्याहूनही अधिक चारित्र्यसंपन्न आयुष्य जगणारे निरागस, निगर्वी, निस्वार्थ पण स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते. सर्वसामान्य चेहऱ्या मागचे असामान्य चेहरे शोधणारे मोरे मामा कधीच लेखकाचे लेखकराव झाले नाहीत, हाच त्यांचा साधेपणातला मोठेपणा त्यांना एक लेखक आणि मोठा माणूस म्हणून चिरंजीव करून गेला. खरतर त्यांच्या जाण्याने केवळ निपाणीची नाही तर अखंड मराठी साहित्य विश्वाची न भरून येणारी हानी झाली आहे, पण मोरे काका, आजन्म तुम्ही शब्द रूपात आमच्या सोबतच असणार आहात, म्हणून मनापासून तुम्हाला ही निपाणी नगरी परिवारातर्फे शब्दाजली…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!