ताज्या घडामोडी

कामशेत मध्ये वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच ; पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कामशेत : शहरातील वाहतूक समस्येला अनेक जण अनधिकृत बांधकामांना दोष देताना पहावयास मिळते. मात्र, व्यापारी वर्ग, नागरिक व वाहनचालकांचा वाहतुकीविषयीचा बेजबाबदारपणा, स्वयंघोषित “पुढारी” वाहने रस्त्यामध्ये उभी करण्याची असलेली मग्रुरी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायती ची वाहतुकीविषयी असलेली उदासीनता आदी कारणे हे सुजाण नागरिक सांगत आहेत.

कामशेत ही मावळ तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ समजली जाते. नाणे, पवन, आंदर मावळासह आजूबाजूच्या सत्तर गावांची ही बाजारपेठ आहे. शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक खासगी शाळा आदी महत्वाची ठिकाणे कामशेत मध्ये असल्यामुळे इथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. गर्दीमुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करतात. कामशेत बाजारपेठेमध्ये दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत असते. शहरातील प्रमुख रस्ता हा यापूर्वी राष्ट्रीय मार्ग होता.या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी बाजारपेठ वसलेली आहे. या मुळे नागरिकांची येथे मोठी रेलचेल असते. काही वर्षांमध्ये वाहतुककोंडीच्या समस्येला कामशेतकरांना तोंड द्यावे लागते आहे.

शहरात सततची होणारी वाहतूक कोंडी कामशेतकरांची डोकेदुखी ठरत आहे. नागरिक वाहनचालकांना तर वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमणांना दोष देत आहेत. तर अनेक सुज्ञ नागरिक ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला दोष देत आहेत. त्यांच्या उदासीन कारभारामुळे कामशेतकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामशेत मध्ये यापूर्वी मध्यवर्ती चौकातील अतिक्रमणे हटवून वाहतूक कोंडी सोडवण्याचा एक प्रयत्न केला होता परंतु तरीदेखील कामशेत शहरातील वाहतूक कोंडी काही कमी झाली. आता ही वाहतूककोंडी कधी कमी होणार असा सवाल कामशेतकर विचारीत आहेत.

शहरात रोज छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाणे रस्ता, पवना चौक आदी ठिकाणी वाहतूककोंडी होत असते तर गणपती चौकात वाहतूककोंडी ही नित्याचीच झालेली आहे. शहरात दिवसभर नागरिकांना व वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतुककोंडी मध्ये फायदा घेत भुरटे चोर, दुचाकी वाहनचोरी सारख्या घटना कामशेत मध्ये घडतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!