ताज्या घडामोडी

पुणे-लोणावळा चौपदीकरण, लोकलवाढ न झाल्यामुळे प्रवाश्यांची घोरनिराशा

चिंचवड : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. त्यात औद्योगिक क्षेत्र असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान सर्व सामान्य प्रवासीयांची दखल न घेतल्यामुळे घोरनिराशा झाली आहे. याचा चिंचवड प्रवासी संघटना निषेध व्यक्त करीत आहे.

गेल्या महिन्यात मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी तसेच, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा चिंचवड रेल्वे स्थानक येथे पाहणी करण्यासाठी आले असताना चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने निवेदन दिले होते.

पिंपरी चिंचवड शहर जगविख्यात औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या आज 27 लाखाहून अधिक आहे. या शहरात अंतरराष्ट्रीय उद्योग समूह आहे. 650 मोठे उद्योग समूह आहे व 10 हजाराच्या आसपास मध्यम व लघू उद्योग, व्यवसायिक आहेत. या शहरात गुजरात, आंध्र प्रदेशातील परिसरातील 2 लाख लोक वास्तव्य करतात. दक्षिण भारतातील केरळ, मद्रास परिसरातील 3 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार परिसरातील 5 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. पश्चिम बंगाल, कलकत्ता परिसरातील दीड लाख लोकसंख्या आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, बीड, लातूर, कोकण, मुंबई, सोलापूर आदी भागातील 8 लाखांहून अधिक लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. कमी कालावधीत उद्योग व्यवसाय वाढीमुळे दिवसेंदिवस या शहरात प्रचंड लोक नोकरी, व्यवसायाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. दररोज 150 हून अधिक एक्सप्रेस गाड्या, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. पुणे येथे किंवा कल्याण, दादर, पनवेल येथे जावून पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आज येत आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढसाठी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने 1989 सालापासून प्रयत्न करीत आहे. रेल्वे अधिकार्यांना भेटले असता निधी उपलब्ध नाही, मुंबईतच लोकल कमी पडतात, लोकल रेक (युनिट लोकल) उपलब्ध झाल्या तर, पुणे-लोणावळा दरम्यान नवीन लोकलवाढ करू असते सांगितले. गेल्या 35 वर्षात रेल्वे मंत्री, मध्यरेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्ड यांच्या बरोबर सातत्याने चिंचवड प्रवासी संघ पत्रव्यवहार करीत असताना रेल्वे विभागाकडून अनेकवेळा लेखील पत्र व आश्वासनच मिळाले. अशातच जानेवारी 2020 साली मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, राज्य शासनाने पुणे-लोणावळा दरम्यान 63 किलोमीटर रेल्वे मागावर तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी एकूण 4300 कोटी रूपयांच्या खर्चापैकी पुणे महानगरपालिकेने 375 कोटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 250 कोटी रूपयांचा खर्च उचलणे बंधनकारकच आहे. तो त्यांनी न दिल्यास संपूर्ण प्रकल्प गुंडाळला जावू शकतो पर्यायाने एकही नवीन लोकल पुणे-लोणावळा दरम्यान सुरू होऊ शकणार नाही., असे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. दोन्ही महापालिकेने देखील आजतागायत रेल्वेला आर्थिक मदत केली नाही.

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के रेल्वे प्रवासीयांवर अवलंबून आहेत. त्याचा विचार केला पाहिजे, ही विनंती प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, नारायण भोसले, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, निर्मला माने, नंदू भोगले, दिलीप कल्याणकर, दादासाहेब माने, सल्लागार अ‍ॅड. मनोहर सावंत, डॉ. राजेंद्र कांकरीया, डॉ. पोर्णिमा कदम यांनी केली आहे.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींना ई-मेलद्वारे निवेदनाची प्रत दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!