रोल बॉल’ मुलींच्या संघाने पटकाविले सुवर्णपदक
‘रोल बॉल’ मुलींच्या संघाने पटकाविले सुवर्णपदक
आवाज न्यूज प्रतिनिधी चिंचवड २० : अखिल भारतीय विद्यापीठाच्या वतीने दिल्ली येथे मेरठ विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवर ‘रोल बॉल’ स्पर्धा संपन्न झाल्या. अंतिम सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मेरठ येथील आय.आय.एम.टी. विद्यापीठ यांच्यात झाला. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर १८ विरुद्ध ७ गुणाने दणदणीत पराभव करून राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक पटकाविले.
या संघात चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली ईशा शिंदे या खेळाडूंने ‘रोल बॉल’च्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी पार पाडली. त्याप्रित्यर्थ महाविद्यालयाच्या कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी ईशा शिंदे च्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या. तर; उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड, पी.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत ईशा शिंदे या खेळाडूला स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देत महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून तिच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.