क्राईमगुन्हाताज्या घडामोडी

कणगल्यात पाच लाखांची धाडसी घरफोडी!

सात तोळे सोने, लाखावर रोकड रक्कम पळवली

Kiran G.Patil M.No.8884357516


संकेश्वर, ता. 19 कणगला (ता. हुक्केरी) येथील एका निवृत्त शिक्षिकेच्या घरात चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. आशा बंडोपंत मोहिते यांच्या घरी ही चोरी झाली असून अंदाजे पाच लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. घटनेची गांभीर्य पाहता परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ऐन सणासुदीच्या व यात्रेच्या दिवसात ही घटना घडल्यामुळे घर बंद करून बाहेरगावी जाणे धोक्याचे ठरत आहे.

या घटने संदर्भात पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आशा मोहिते यांच्या घराला कुलूप होते. रविवारी रात्री चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. तिजोरी व इतर खोलीतील साहित्य विस्कटून मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. यामध्ये त्यांच्या हाती सुमारे पाच लाखांचा ऐवज हाती लागला आहे. तिजोरीच्या लॉकर मधील 70 ग्रॅम (7 तोळे) सोन्याचे दागिने व रोख 1 लाख 20 हजार रूपये चोरट्यांच्या हाती लागले असून त्यांनी हा ऐवज घेऊन पोबारा केला.

चोरट्यांनी या घरात चोरी करताना आजूबाजूच्या लोकांच्या घरांना बाहेरून कडी लावली होती. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणातील चोरटे सराईत असण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा ही चोरी झाली असून सकाळी काही घरांच्या दरवाजांना बाहेरून कडी असल्याने गावामध्ये खळबळ उडाली होती.त्यानंतर मोहिते यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. याची माहिती मिळताच संकेश्वर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक शिवशरण आवजी व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. बेळगाव हून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.


चोरीच्या प्रकरणात सर्वत्र साधर्म्य पण पोलीस मात्र हतबल..

संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी चोरी झाल्यास काही गोष्टी मध्ये इतके साधर्म्य असते की ही चोरी नेमकी बेळगाव मध्ये झाली की चिकोडी मध्ये झाली की निपाणी मध्ये झाली हे सांगणे कठीण होते. कारण चोरी झालेल्या घरातील परिस्थिती पाहता बंद दरवाजाचे कुलूप तोडणे, त्या घरातील मंडळी कार्यक्रमास जाणे, शेजारील घरांच्या दरवाज्याच्या कड्या लावणे, या वर्षी गोष्टींचे अनेक साधर्म्य प्रत्येक चोरीत आढळत असल्यामुळे पोलीस देखील चोरट्यांना शोधण्यासाठी एक प्रकारे हतबल होत असतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!