आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

अधिविभागातील संशोधकीय साहचर्य वृद्धिंगत व्हावे!

शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के!

Kiran G.Patil M.No.8884357516


कोल्हापूर, दि. २८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमध्ये निर्माण होत असलेले संशोधकीय साहचर्य व देवाणघेवाण वृद्धिंगत होत राहावे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेसच्या वतीने आज विद्यापीठातील पेटंटप्राप्त तसेच प्रकल्प अनुदानप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेल्या संशोधकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधीपासूनच विद्यापीठातील विविध अधिविभागांतील संशोधकांमध्ये संशोधन सहकार्य सुरू झाले. विशेष म्हणजे विज्ञान शाखांमध्ये अंतर्गत सहकार्यवृद्धी बरोबरच सामाजिक विज्ञान शाखांशीही सहकार्य सुरू झाले. आज अशा प्रकारच्या आंतर विभागीय, आंतरविद्या शाखीय संशोधन प्रकल्पांमध्ये वृद्धी होण्याची मोठी आवश्यकता आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये उच्चशिक्षणा विषयी ओढ जागृत व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही आतापासूनच विद्यापीठाशी जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठातील संशोधकांनी विषयांतर्गत तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. ती अबाधित राखण्यासाठी संशोधनात सातत्य ठेवा. आता पेटंटच्या पुढचा विचार करताना त्याचे तंत्रज्ञानात अथवा वाणिज्यिक उपयोजनात रुपांतर करता येऊ शकेल का, या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी डॉ. महाजन यांनी कुलगुरू व प्र-कुलगुरू हे दोघेही संशोधनकार्य करणाऱ्यांना सातत्याने उभारी देण्याचे काम करतात आणि त्यांचे मार्गदर्शन उत्तम नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. राहुल माने, डॉ. के.डी. कुचे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. संतोष सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. राहुल माने, डॉ. किशोर खोत, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. कबीर खराडे, प्रमोद कोयले (सर्व पेटंटधारक), डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. एस.ए. संकपाळ, डॉ. के.डी. कुचे (सर्व विविध संशोधन प्रकल्पधारक), डॉ. सुनील गायकवाड, अक्षय खांडेकर, डॉ. डोंगळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. पद्मा दांडगे (आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधांचे लेखक) यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. डॉ. डेळेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आणि आभार मानले.


गायत्री गोखलेला ‘पेटंटदूत’ पत्र प्रदान……

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाची बी.टे. तृतीय वर्षात शिकणारी पेटंटधारक विद्यार्थिनी गायत्री गोखले हिला विद्यापीठाची ‘पेटंट सदिच्छादूत’ बनवावे, अशी सूचना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या बैठकीमध्ये केली होती. त्यानुसार तिला आज कुलगुरूंच्या हस्ते पेटंटदूत म्हणून पत्र प्रदान करण्यात आले. विविध महाविद्यालयां मध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधून त्यांना संशोधनासाठी प्रेरित करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!