आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

निपाणीचे सुपुत्र अनुप जत्राटकर यांचा “गाभ” चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीस!

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला गेलेला चित्रपट २१ जूनला सर्वत्र प्रदर्शित!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (20)

येथील लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट ‘गाभ’ हा उद्या 21 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ३६ राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून प्रदर्शनासह पुरस्कार प्राप्त केले आहेत. तमाम निपाणी वासियांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असून हा चित्रपट पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागातील नागरिक अतिशय उत्सुक आहेत.

“गाभ” या चित्रपटाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचेच असून ते चित्रपटाचे सहनिर्माता देखील आहेत. सन 2005 पासून लघुपट, माहितीपट निर्मिती क्षेत्रात आपल्या कार्याचा विलक्षण ठसा उमटविल्यानंतर ‘गाभ’ ही एक अत्यंत साधीसोपी ग्रामीण जीवनाशी निगडित, पण आजवर कधीही पडद्यावर न आलेली कथा अनुप मोठ्या पडद्यावर घेऊन आले आहेत. आजवर शेती, शेतकऱ्यांशी निगडित अनेक चित्रपट आले. विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न या अनुषंगाने आलेल्या चित्रपटांची संख्या लक्षणीय राहिली. तथापि, शेतीपूरक व्यवसायाशी निगडित बाबींच्या संदर्भाने आलेल्या चित्रपटांची संख्या जवळजवळ नगण्य म्हणावी अशीच. अनुप जत्राटकर यांनी मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या, महत्त्वाच्या आणि चित्रपटांच्या इतिहासात कधीही मोठ्या पडद्यावर न आलेल्या प्रश्नाला हात घातला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हशींना “गाभ घालण्याच्या” अनुषंगाने भेडसावणारी समस्या म्हणजे रेड्यांची वानवा. दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे गाभ घालण्याची प्रक्रिया. रेड्यांची संख्या ही फार कमी होत चालली आहे. आठ-दहा गावांत मिळून एखादाच रेडा असतो आणि म्हशींची संख्या मात्र घरटी किमान एक-दोन असते. या म्हशींना गाभ घालण्यासाठी रेडा मिळत नाही. यावर उपाय म्हणून कृत्रिम रेतनासारखे उपाय जरी शोधून काढण्यात आले असले तरी मूळ रेड्याची गरज त्यामुळे कमी होत नाही, हे सत्य आहे. नेमकी हीच समस्या ‘गाभ’ चित्रपटाच्या मध्यवर्ती आहे. जनावरां मधील कमी होत जाणारी रेड्यांची संख्या आणि माणसांत कमी होत चाललेली मुलींची संख्या या विरोधाभासा वरती ‘गाभ’ हा चित्रपट भाष्य करतो.


चित्रपटाचे वेगळे कथानक …

गाभ’चा नायक दादू याच्याकडे एक म्हैस आहे. त्याच्या पारंपरिक विचारांच्या आजीला त्या म्हशीला नैसर्गिक पद्धतीनेच गाभ घालावयाची आहे. चित्रपटाची नायिका फुलवा हिच्याकडे रेडा आहे. मात्र, दादूचे आणि फुलवाचे काही कारणाने पटत नाही. त्यामुळे त्याच्यासमोर म्हशीला रेडा दाखविण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. दुसरीकडे स्वतः दादू हा काही कारणांनी नकारात्मक बनलेला आहे. त्यालाही लग्नासाठी मुली मिळत नाहीत. म्हणून गावातले लोक त्याला टोणगा म्हणून हिणवत असतात. आता अशा परिस्थितीत म्हशीसाठी रेडा शोधायला बाहेर पडलेल्या दादूमध्ये या प्रवासादरम्यान सकारात्मक बदल होत जातात. त्यालाच त्याचा पुन्हा नव्याने शोध लागतो. त्याच्या या दुहेरी शोधाची कथा म्हणजे ‘गाभ’ आहे.

गाण्यांनी घातलाय धुमाकूळ…..

चित्रपटाचा विषय अत्यंत वेगळा असल्यामुळे दर्शकांमध्ये तो पाहण्याची प्रचंड मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपटाच्या विषयाला पूरक अशा गाण्यांनी समाजमाध्यमांवर मोठा धुमाकूळ घातला आहे. ‘तुझ्यापायी मन झालं येडं रं खुळं’ या सावनी रविंद्र आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी गायिलेल्या अत्यंत श्रवणीय गीतानं तरुणाईला वेड लावलं आहे. देशभरातल्या तरुणाईनं त्यावर रिल्स करून समाजमाध्यमांवर टाकले आहेत. त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाचं दुसरं गाणं ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘मी तुझा रेडा, तू माझी म्हस गं’ हे लोकगीताचा बाज असणारं गाणंही आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसह सर्वांच्याच ओठावर येऊ लागलं आहे. समाजमाध्यमांवर हे गाणंही अत्यंत ट्रेंडिंगमध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचे गीतकार, संगीतकार चंद्रशेखर जनवाडे हे सुद्धा निपाणी जवळील बेनाडी या गावचे आहेत. चित्रपटाच्या विषयाला साजेसे गीतलेखन आणि संगीत त्यांनी दिले आहे. या चित्रपटगीतांचे मास्टरिंग हे लंडन येथील प्रख्यात हॅफोड मास्टरिंग वेल्सच्या गेथीन जॉन यांनी केलेले आहे.

चित्रपटाचे बहुतांश पोस्ट प्रोडक्शन निपाणीमध्ये…..

गाभ’ या चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्याच्या पोस्ट प्रोडक्शनची बहुतांश कामे ही निपाणी येथील अनुप जत्राटकर यांच्या ‘प्रियदर्शन अटेलियर’ या व्यक्तीगत स्टुडिओमध्ये झालेली आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर संकलन, मिक्सिंग, फॉली (ध्वनीमिश्रण), गीत ध्वनीमुद्रण, संगीत संयोजन अशी महत्त्वाची कामे निपाणीमध्ये झालेली आहेत. व्हीएफएक्स व पार्श्वसंगीताचे काम कोल्हापूरमध्ये तर केवळ संगीत मास्टरिंग आणि सीजीआय-डीआय (डिजीटल एनहान्समेंट), कलर करेक्शन ही कामे मुंबईतील प्रख्यात स्टुडिओमध्ये झालेली आहेत.

अनेक मोठ्या कलाकारांचा सहभाग…..

अनुप जत्राटकर यांचे लेखन-दिग्दर्शन लाभलेल्या ‘गाभ’ या चित्रपटाशी अनेक दिग्गज म्हणावीत अशी मोठी कलाकार मंडळी जोडली गेलेली आहेत. अनुप जत्राटकर हे स्वतः सहनिर्माता आहेत. कोल्हापूरचे मंगेश नारायण गोटूरे आणि त्यांच्या मातोश्री सुमन नारायण गोटूरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. यामध्ये कैलाश वाघमारे यांच्यासारखा अत्यंत नावाजलेला अभिनेता प्रमुख भूमिकेत आहेत. त्याखेरीज कोल्हापूरचे विकास पाटील, उमेश बोळके आदींच्या भूमिका आहेत. सवाई सारखी एकांकिका स्पर्धा जिंकलेली सायली बांदकर या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. प्रख्यात कॅमेरामन वीरधवल पाटील यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर यांनी दोन्ही गीतांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. मुख्य कलादिग्दर्शक म्हणून जत्राट गावचे सुपुत्र (कै.) सुंदरकुमार कांबळे यांनी काम पाहिले आहे. नागराज मंजुळे यांच्या फँड्रीसह भारतीय, जन-गण-मन चित्रपटांसाठी सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केलेल्या सुंदर यांचा हा स्वतंत्र कलादिग्दर्शक म्हणून पहिला आणि अखेरचाही चित्रपट ठरला. संगीत, गीत, ध्वनीरचना बेनाडीचे सुपुत्र चंद्रशेखर जनवाडे यांची आहे. गीतांचे मिक्सिंग आणि मास्टरिंग आजीवासन स्टुडिओच्या अवधूत वाडकर यांनी केले आहे. ध्वनीची जबाबदारी (कै.) प्रकाश निकम यांनी पाहिली आहे. संकलन व पार्श्वसंगीताची जबाबदारी रविंद्र चांदेकर यांनी पाहिली आहे. प्रख्यात गायक आनंद शिंदे, सावनी रविंद्र आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी गाणी गायिली आहेत. याखेरीज रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैत्राली गानू, व्हीएफएक्स माधव चांदेकर, प्रोडक्शन व्यवस्थापक रंगराव पाटील, डीआय फायनल मिक्स आफ्टरप्ले स्टुडिओ, पब्लिसिटी डिझाईन मयूर प्रकाश कुलकर्णी, व्हिज्युअल प्रमोशन प्रेमांकुर बोस अशी अनेक मोठी नावे चित्रपटाशी जोडली गेली आहेत.

महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात प्रचंड उत्सुकता….

निपाणी आणि कोल्हापूर परिसर ही अनुप जत्राटकर यांची कर्मभूमी आहे. तसेच चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे गडहिंग्लज, आजरा तालुक्यांतील सरोळी, हारूर आदी गावांच्या परिसरात झालेले असल्यामुळे या सर्वच भागात ‘गाभ’ या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ठिकठिकाणी दर्शकांनी स्वतःच चित्रपटाचे पोस्टर लावून प्रसिद्धी चालविली आहे. या लावलेल्या पोस्टरच्याही पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. चित्रपटाचा प्रचार हा कोल्हापूर, निपाणी परिसरात रिक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रचारालाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद लाभतो आहे. ‘गाभ’ चित्रपटाविषयी प्रचंड असे कुतूहल असून 21 जूनला चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहणारच, असा मानस दर्शक व्यक्त करताहेत. महत्त्वाचे म्हणजे सीमाभागातील पुरोगामी चळवळींचे केंद्र असलेल्या निपाणीमधील एक धडपड्या युवक चित्रपटा सारख्या एका वेगळ्या क्षेत्रात आपल्या गावाचे नाव उज्जवल करू पाहतो आहे, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा चित्रपट निश्चित पाहणार आहोत, अशी भावनाही रसिकांनी व्यक्त केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!